Sambhajinagar Freight transport meeting pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Freight transport meeting : मालवाहतूक वाढीसाठी रेल्वेचा उद्योजकांशी संवाद

मालवाहतुकीच्या अनेक पैलूंवर समाधानकारक चर्चा

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात झपाट्याने वाढणाऱ्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि रेल्वेच्या मालवाहतुकीत वाढ करण्याच्या उद्देशाने दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.९) सकाळी छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर उद्योजक व व्यापाऱ्यांशी विशेष संवाद बैठक घेतली. यात मालवाहतुकीच्या अनेक पैलूंवर समाधानकारक चर्चा करण्यात आली.

आगामी काळातील मालवाहतुकीबाबत उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा आणि सूचना जाणून घेण्यात आल्या. या बैठकीत रेल्वेमार्गे मालवाहतूक अधिक वाढीसाठी उद्योगांना कोणत्या सुविधा आवश्यक आहेत, गरजेनुसार रेल्वे सेवांमध्ये कोणते बदल करावेत, यावर सविस्तर चर्चा झाली.

बैठकीला सिनियर डिसीएम जे. सुकेश दीपक यांच्यासह आयआयएम बंगळूरू राघवराम, राजीव त्रिपाठी, कृष्णा मोहन, रेल्वेस्थानक व्यवस्थापक सुनील बिरारे, विजय जैस्वाल, मंगेश निरठूरकर, राहुल मोगले, एस. के. सोहेल, निखिल भालेराव यांच्यासह इतर उद्योजक व व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला.

यावेळी उपस्थित उद्योजकांनी रेल्वे मालवाहतुकीबाबत चर्चा केली. माल बुकिंग प्रक्रिया सुलभ करणे, कंटेनर सुविधा वाढविणे, उद्योग क्षेत्रांपर्यंत रेल्वेचे जाळे, माल हाताळणीसाठी आधुनिक यंत्रणा, तसेच वेळेवर रेक उपलब्ध करून देण्याबाबत सूचना करण्यात आल्या. रेल्वे अधिकाऱ्यांनी या सूचनांबाबत रेल्वे प्रशासन सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले.

  • मालवाहतुकीला मोठी संधी शहरात टोयोटा, एथर यांसारख्या मोठ्या उद्योगांची गुंतवणूक होत असून, आगामी काळात वाहन, अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स आणि उत्पादन क्षेत्रातील अनेक उद्योग येथे कार्यरत होणार आहेत. त्यामुळे कच्चा माल तसेच तयार उत्पादनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार आहे. त्या अनुषंगाने रेल्वेने उद्योजकांना रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करून रेल्वेमार्गे सुलभ आणि वेळेत सेवा देण्याचे नियोजन केले आहे. या नियोजनांमुळे रेल्वेला मोठ्या प्रमाणात मालवाहतूक मिळणार असल्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT