देवगाव रंगारी येथील सोंगाच्या पंचमी उत्सवाची उत्साहात सांगता file photo
छत्रपती संभाजीनगर

देवगाव रंगारी येथील सोंगाच्या पंचमी उत्सवाची उत्साहात सांगता

पारंपरिक सोंगे, मिरवणूक, धार्मिक कार्यक्रमांनी गाव भक्तिमय

पुढारी वृत्तसेवा

Songa-chi Panchami Festival at Devgaon Rangari Concludes with Great Enthusiasm

देवगाव रंगारी, पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे भगवान नरसिंह जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक सोंगाच्या पंचमी उत्सवाची मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक जल्ल-ोषात सांगता करण्यात आली. पाच दिवस चाललेल्या या उत्सवात गावासह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी उपस्थिती लावत धार्मिक कार्यक्रमांचा आनंद घेतला. प्राचीन परंपरेचा वारसा जपणाऱ्या या उत्सवामुळे संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले होते.

देवगाव रंगारी येथील सोंगाच्या पंचमी उत्सवाला अनेक दशकांची धार्मिक व सांस्कृतिक परंपरा लाभली असून हा उत्सव गावाच्या अस्मितेचा अविभाज्य भाग मानला जातो.

अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पंचमी उत्सवाची मुहूर्तमेढ रोवण्यात आल्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ करण्यात आला. रात्री पारंपरिक सोंगांचे सादरीकरण करण्यात आले. भगवान नरसिंह अवताराचे सोंग हे यंदाच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. सोंग सादर होताच भाविकांनी जयघोष करत वातावरण भक्तिमय केले.

या पंचमी उत्सवात पाच दिवस विविध देवी-देवतांची सोंगे सादर करण्यात आली. विदुषक, गणपती आणि सरस्वती यांच्या सोंगाने उत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर राम-लक्ष्मण, वेताळ, बाळंतिण, रेणुकामाता, कालीकामाता, शंकर पार्वती, संतोषीमाता, रावण, वानर ताटी, खंडोबा, वीरभद्र, तुळजाभवानी, पाटणा देवी आदी विविध देवतांची सोंगे आकर्षक मुखवटे आणि पारंपरिक वेशभूषेत सादर करण्यात आली.

घंटानाद, ढोल-ताशांचा गजर आणि लोकसंगीताच्या तालावर सादर होणाऱ्या या सोंगांनी भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. रंगीबेरंगी पोशाख, आकर्षक अलंकार आणि पारंपरिक वेशभूषेमुळे सोंग अधिक देखणे दिसत होते. गावातील कलाकारांनी साकारलेल्या विविध भूमिकांनी उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT