Sold a plot of land—which was actually under municipal encroachment—by falsely claiming it was a legal property
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या आरक्षणात आणि अतिक्रमणात जाणार असल्याची माहिती असतानाही भूखंड कायदेशीर असल्याचे सांगून एका व्यावसायिकाची १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कांचनवाडी येथे उघडकीस आला. भूखंडावरील पत्र्याचे शेड महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पाडल्यानंतर हा प्रकार समोर आला.
याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक रावसाहेब गायके (५६, रा. कांचनवाडी) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी अरबाज इलियास कुरेशी (२७, रा. कांचनवाडी) हा चिकन शॉप सुरू करण्यासाठी पैठण रोड परिसरात रस्त्यालगत जागा शोधत होता.
त्यावेळी गायके याने कांचनवाडीतील गट क्रमांक १० मधील सुमारे एक हजार चौरस फुटांचा पत्र्याचे शेड असलेला भूखंड दाखवला. ही मालमत्ता कायदेशीर असल्याचे सांगत भविष्यात काही वाद झाल्यास आपण पाहून घेऊ, अशी ग्वाही दिली. दुय्यम निबंधक कार्यालयात नियमित खरेदीखते बंद असल्याचे सांगून गायके याने १२ नोव्हेंबर २०२४ रोजी नोटरीद्वारे व्यवहार केला.
यासाठ कुरेशी याने पाच लाखांचा चेक दिला उर्वरित सात लाखांचा चेक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने वटला नाही त्यानंतर गायकेच्या मागणीनुसा कुरेशी याने दोन पंचांसमक्ष सात लाख रुपये रोख दिले. अशा प्रकारे एकूण १२ लाख रुपये दिले.
मनपाच्या कारवाईनंतर फसवणूक उघड
व्यवसाय सुरू केल्यानंतर चार महिन्यांतच महापालिकेच्या पथकाने भूखंड रस्त्यात व अतिक्रमणात असल्याचे सांगून पत्र्याचे शेड पाडले. त्यामुळे भूखंडाचा निम्म्याहून अधिक भाग बाधित झाल्याचे कुरेशीच्या लक्षात आले. त्याने गायकेकडे जाब विचारला असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देत धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेश गोले तपास करीत आहेत.