Smuggling of expensive powder under the guise of transporting scrap metal
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा औषधी कंपनीमधून भंगार वाहतुकीच्या नावाखाली औषधी तयार करण्यासाठी लागणारी महागडी पावडरची वाहतूक करणारे दोन ट्रक अमली पदार्थ विरोधी पथक व एमआयडीसी वाळूज पोलिसांनी शनिवारी (दि.२१) सकाळी साजापूर फाट्याजवळ पकडले. या ट्रकमधून पोलिसांनी १ किलो ४०० ग्रॅम महागडी पावडर जप्त केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका औषधी कंपनीमधून भंगार वाहतुकीच्या नावाखाली महागड्या पावडरची तस्करी होत असल्याची माहिती एनडीपीएस पथकाच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांना मिळाली होती. यावरून पोलिस निरीक्षक बागवडे, पोलिस उपनिरीक्षक अमोल म्हस्के, पोलिस अंमलदार लाला पठाण, छाया लांडगे, सतीश जाधव, संदीप धर्मे, शिल्पा तेलोरे, विजय त्रिभुवन, महेश उगले तसेच एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे, संजय गिते यांनी शनिवारी सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास सोलापूर-धुळे महामार्गावरील साजापूर भागात सापळा रचला होता.
यावेळी संशयित भंगार वाहतूक करणारे ट्रक (एमएच०४ ईवाय ९९७०) व (एमएच ०४ बीयु ५१६०) दिसून येताच पोलिसांनी दोन्ही ट्रक पकडून ट्रकमध्ये पाहणी केली असता त्यांना रिकाम्या ड्रममधील प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये काही प्रमाणात पावडर असल्याचे दिसून आले. पोलिसांनी दोन्ही ट्रक पोलिस ठाण्यात आणून पिशव्यामधील सर्व पावडर एकत्रित करून वजन केले असता ती १ किलो ४०० ग्रॅम भरली.
दरम्यान पोलिसांनी वैज्ञानिक प्रयोग शाळेचे सहायक रासायनिक विश्लेषक विनोदकुमार शहागडकर, परिचर प्रशांत कवडे व पंचासमक्ष पंचनामा करून यातील काही पावडर प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर सदरील पावडर कोणती, त्याची किंमत किती आहे हे कळू शकेल असे पोलिस निरीक्षक गिता बागवडे यांनी सांगितले. दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री साजापुरात पुन्हा एका गोडावूनची झडती घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान पथकाने बबन खान याच्या साजापूर येथील दोन भंगाराच्या गोडाऊनची तपासणी केली. तसेच याठिकाणी पोलिस अंमलदार तैनात करून याची माहिती प्रदूषण नियंत्रण महामंडळाला दिली.
वाळूज महानगर परिसरात अनेक भंगाराची तसेच इतर गोडाऊन आहेत. या गोडाऊनमध्ये काय ठेवले जाते व कोणता व्यवसाय केला जातो याची माहिती स्थानिक ग्रामपंचायती व पोलिस प्रशासनाला नसल्याने परिसरात अवैध धंदे करणाऱ्याचे फावत आहेत. वाळूज एमआयडीसीमुळे या भागात उद्य- ोजक, भंगार व्यावसायिक तसेच इतर व्यवसाय करणारे व्यावसायिक शेकडो गोडाऊन भाड्याने घेऊन आपले व्यवसाय सुरू केले आहेत. तर काहीजण मात्र या गोडाऊनचा वापर अवैध धंदे करण्यासाठी करतात. अनेकांना याविषयी माहिती असूनही अवैधधंदे करणाऱ्यांच्या दहशतीमुळे त्यांच्याविरोधात तक्रार करण्यास कोणीही पुढे धजावत नसल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच फावत आहेत.