Smart Meters: Concession for consumers on daytime electricity usage
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : स्मार्ट मीटर वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीज वापरावर महावितरण सवलत देत आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील पावणेतीन लाख घरगुती ग्राहकांना आतापर्यंत सुमारे ४ कोटी रुपयांची सवलत मिळाली असल्याची माहिती महावितरणने दिली.
स्मार्ट मीटर वापरणाऱ्या घरगुती वीज ग्राहकांना जुलै-२०२५ पासून दिवसा वीज वापरांवर सवलत देण्यात येत आहे. जुलै २०२५ ते मार्च २०२६ पर्यंत ८० पैसे प्रतियुनिट सवलत मिळाली. यंदा ही सवलत ८५ पैसे प्रतियुनिट असून, पुढील तीन आर्थिक वर्षात ती वाढत जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगर परिमंडलात २ लाख ७२ हजार ५६९ घरगुती ग्राहकांना जुलै २०२५ ते मे-२०२६ या ११ महिन्यांच्या वीजबिलात ३ कोटी ८१ लाख १७ हजार १२८ रुपयांची टीओडी सवलत मिळाली. छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील ७१ हजार ६८७ग्राहकांना १ कोटी ५४ लाख २१ हजार २०९ रुपये, ग्रामीण मंडलातील १ लाख ३९ हजार ४४० ग्राहकांना १ कोटी ५३ लाख ६८ हजार ४५५ रुपये तर जालना मंडलातील ६१ हजार ४४२ ग्राहकांना ७३ लाख २७ हजार ४६४ रुपये सवलत मिळाली.
ऑटोमॅटिक रीडींग
नव्या तंत्रज्ञानाच्या मीटरचे रीडिंग ऑटोमॅटिक होत असल्याने अचूक बिले मिळून, घरातील विजेचा वापर दर तासाला संबंधित ग्राहकांना मोबाईलवर पाहता येण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याद्वारे ग्राहकांचे वीजवापरावरही थेट नियंत्रण राहणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत घरातील प्रामुख्याने वॉशिंग मशीन, ओव्हन, गिझर, एअर कंडिशनर व इतर उपकरणांचा मोठा वापर करतात. त्यात टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा मोठा मिळत आहे.