

छत्रपती संभाजीनगर : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेत मराठवाड्यातील 93 हजारांहून अधिक ग्राहक विजेबाबत स्वावलंबी झाले आहेत. त्यांच्या घराच्या छतावर 341 मेगावॅट स्थापित क्षमतेचे सौर ऊर्जा संच कार्यान्वित करण्यात आले आहेत. या योजनेत ग्राहकांना वीजबिल जवळपास शून्य करणे शक्य असल्याने जास्तीत जास्त ग्राहकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने यांनी केले आहे.
केंद्र सरकारने फेब्रुवारी-2024 मध्ये ही योजना सुरू केली. घराच्या छतावर 1 ते 3 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रणालीद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे 120 ते 360 युनिट वीज मिळविण्याची संधी या योजनेत मिळत आहे. त्यामुळे या योजनेस मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत वीजग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे.
सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी 30 हजार रुपये, 2 किलोवॅटसाठी 60 हजार रुपये आणि 3 किलोवॅट आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल 78 हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. तसेच गृहनिर्माण संस्था, गृहसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व सामायिक उपयोगासाठी 500 किलोवॅटपर्यंत प्रति किलोवॅट 18 हजार रुपये असे कमाल 90 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे.
पीएम-सूर्यघर योजनेत शासनाचे अनुदान आणि महावितरणकडून ऑनलाइन सुविधा यामुळे ही योजना सर्वांसाठी सोपी आणि फायदेशीर ठरली आहे. मराठवाड्यातील ग्राहकांनी योजनेचा लाभ घ्यावा.
आदित्य जीवने, सहव्यवस्थापकीय संचालक