Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation File Photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Smart City : स्मार्ट सिटी हस्तांतरणामुळे मनपावर वेतनाचा वाढता भार

४३ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी वर्षाला ३.११ कोटींची तरतूद

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट सिटी मिशन बंद झाल्यानंतर त्याअंतर्गत राबविण्यात आलेले प्रकल्प आणि यंत्रणा महापालिकेकडे वर्ग करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या प्रक्रियेसोबतच स्मार्ट सिटी कंपनी आणि सिटीबस विभागातील एकूण ४३ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या माध्यमातून पुढेही सेवा देण्याची तयारी दर्शविल्याने त्यांच्या वेतनाचा अतिरिक्त आर्थिक भार आता पालिकेवर पडणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी महापालिकेला दरमहा सुमारे २६ लाख रुपये, तर वर्षाकाठी ३ कोटी ११ लाख ८८ हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत.

केंद्र शासनाने ३१ मार्च २०२६ रोजी स्मार्ट सिटी मिशनची मुदत समाप्त केल्यानंतर देशभरातील स्मार्ट सिटी प्रकल्प संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. छत्रपती संभाजीनगरमध्येही काही प्रकल्पांचे हस्तांतरण पूर्ण झाले असून काही प्रकल्प अद्याप संक्रमण प्रक्रियेत आहेत. याच पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी आणि सिटीबस विभागातील कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे.

स्मार्ट सिटी कार्यालयात कार्यरत असलेल्या १५ अधिकारी-कर्मचाऱ्यांपैकी चार जणांनी महापालिकेच्या सेवेत येण्यास नकार दिला आहे. मात्र उर्वरित ११ कर्मचाऱ्यांनी महापालिकेसोबत काम सुरू ठेवण्याची तयारी दर्शविली आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पूर्वी दरमहा ११ लाख १३ हजार ८२२ रुपये खर्च होत होता. आता त्यांची आर्थिक जबाबदारी महापालिकेवर येणार आहे. दरम्यान सिटीबस विभागात एकूण ३४ अधिकारी-कर्मचारी कार्यरत होते. त्यापैकी दोन जणांनी महापालिकेमार्फत सेवा देण्यास नकार दिला असून ३२ जणांनी सहमती दर्शविली आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महापालिकेला दरमहा १४ लाख ८५ हजार १७९ रुपये खर्च करावे लागणार आहेत.

मनपासमोर अतिरिक्त आर्थिक नियोजनाचे आव्हान

स्मार्ट सिटी कार्यालयातील ११ आणि सिटीबस विभागातील ३२ असे एकूण ४३ अधिकारी-कर्मचारी महापालिकेच्या सेवेत समाविष्ट झाल्यास त्यांच्या वेतनासाठी दरमहा २५ लाख ९९ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. वार्षिक स्तरावर हा आकडा ३ कोटी ११ लाख ८८ हजार रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे आधीच आर्थिक मर्यादांमध्ये काम करणाऱ्या महापालिकेसमोर अतिरिक्त आर्थिक नियोजनाचे आव्हान उमे राहणार आहे. प्रकल्पांच्या हस्तांतरणासोबतच उपलब्ध मनुष्यबळाचा प्रभावी वापर आणि आर्थिक व्यवस्थापन यावर प्रशासनाचा भर राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT