Sixteen lakh farmers deprived of subsidies due to lack of e-KYC
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मराठवाड्यातील ४४ लाख १७ हजार शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने २९१२ कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले. परंतु आतापर्यंत २१ लाख शेतकऱ्यांनाच अनुदान वाटप होऊ शकले आहे. उर्वरित १६ लाख २३ हजार शेतकऱ्यांचे अनुदान ई-केवायसी नसल्यामुळे वितरित झालेले नाही. या शेतकऱ्यांची ११३९ कोटी रुपयांची रक्कम तशीच पडून आहे.
मराठवाड्यात यंदा सर्वच जिल्ह्यांत सातत्याने अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरिपाच्या पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी हेक्टरी साडे आठ हजार रुपयांप्रमाणे अनुदान मंजूर केले. मराठवाड्यातील एकूण ४४ लाख १७ हजार शेतकऱ्यांसाठी एकूण २९१२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे.
सध्या त्याचे वाटप सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली आहे, त्यांचे अनुदान वाटप झाले आहे. मात्र, अजूनही १६ लाख २३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही. या शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नसल्याने त्यांना हे अनुदान मिळू शकलेले नाही.