Six-month-old baby kidnapped from Gujarat rescued
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा गुजरातमधून अपहरण झालेल्या सहा महिन्यांच्या चिमुकलीची गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (दि.३१) रेल्वेस्टेशनवर शोधून तिची सुखरूप सुटका केली. तिचे अपहरण करून नाशिकच्या एजंटमार्फत हैद्राबाद येथे विक्रीसाठी निघालेल्या चौघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.
जयेश त्रिकमभाई राठोड (२६), बिमल प्रफुल्लकुमार सोलंकी (३०), मनीषा महेश सोलंकी (२९, सर्व रा. गुजरात) आणि समाधान केवल जगताप (३२, रा. नाशिक) अशी आरोपींची नावे आहेत. गुजरातमधील अहमदाबाद ग्रामीण जिल्ह्यातील होलका शहरातून बुधवारी (दि.३०) रात्री एका अज्ञाताने सहा महिन्याच्या मुलीचे अपहरण केले होते.
अपहरणानंतर चिमुकलीला हैदराबाद येथे विक्रीसाठी हैद्राबादकडे घेऊन जात असल्याची माहिती गुजरात पोलिसांकडून छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेला मिळाली. उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने तत्काळ शोध सुरु केला. रेल्वे स्टेशन परिसरात दुपारी चारच्या सुमारास संशयास्पद चार जण एक बालकासह आढळले.
चौकशीत अपहरण झालेली चिमुकली असल्याचे स्पष्ट झाले. चिमुकलीला सुखरूप पोलिसांनी सोडवून चौघांना ताब्यात घेतले. चिमुकलीसह चौघांना गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संभाजी पवार, पीएसआय संदीप शिंदे, जमादार योगेश नवसारे, मनोज विखनकर, राहुल बंगाळे, विजय घुगे, प्रीती इलग, सोमनाथ दुकळे यांनी केली.