सिल्लोड : सिल्लोड तालुक्यातील वांगी खुर्द शिवारात शेतजमिनीच्या मालकी हक्काच्या वादातून एका महिलेवर व तिच्या पतीवर मारहाण केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी सहा जणांविरुद्ध सिल्लोड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रंजनाबाई बालाजी जाधव (48, व्यवसाय शेती-घरकाम, रा. वांगी खुर्द, ता. सिल्लोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा महादू जाधव, नारायण महादू जाधव, अक्षय नारायण जाधव, भगवान महादू जाधव, गणेश विठ्ठल जाधव व वंदना कृष्णा जाधव (सर्व रा.वांगी खुर्द) अशी आरोपींची नावे आहेत.
दि. 14 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास वांगी खुर्द शिवारातील शेत गट क्रमांक 191 मध्ये ही घटना घडली. फिर्यादी व आरोपी हे एकाच गावातील असून, शेतजमिनीच्या मालकी हक्कावरून सिल्लोड न्यायालयात गेल्या सुमारे एक वर्षापासून वाद सुरू आहे.
घटनेच्या वेळी फिर्यादी व साक्षीदार हे शेजारील रस्त्यावर उभे असताना आरोपी कृष्णा महादू जाधव, नारायण महादू जाधव, अक्षय नारायण जाधव, भगवान महादू जाधव, गणेश विठ्ठल जाधव व वंदना कृष्णा जाधव (सर्व रा.वांगी खुर्द) यांनी बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ करत मारहाण केली.
आरोपी क्रमांक 1 व 3 यांनी तेथे पडलेले दगड उचलून फिर्यादीच्या पतीच्या कपाळावर मारून दुखापत केल्याचा आरोप आहे. तसेच आरोपी क्रमांक 2, 4 ते 6 यांनी फिर्यादी व साक्षीदारांचे केस धरून चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. तपास पोहकॉ यतीन कुलकर्णी करीत आहेत.