उंडणगाव :सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे शुक्रवार (दि. २) मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास ८ ते १० चोरट्यांच्या टोळीने धुमाकूळ घातला. पाच घरांचे कुलूप तोडून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने तसेच एक दुचाकी असा लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोरट्यांनी राधाबाई कौतिक पाटील यांच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी कुलूप तोडले. घरातून दीड ते पावणेदोन लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली. दीपाली काकासाहेब लांडगे यांनी बचत गटाचे कर्ज काढून घरात ठेवलेले ४० हजार रुपये तसेच लोखंडी पेटीतील सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.
चंद्रकलाबाई नागू लांडगे या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी जामनेर येथे गेल्या असताना त्यांच्या बंद घरातून २० ते २२ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली. रुक्मिणी देवी ओंकार दुसात या मुलाच्या शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या होत्या. त्यांच्या घरातून रोख रक्कम आणि चांदीची भांडी चोरट्यांनी नेली.
तुळशीराम मोकासरे हे पितृपक्षानिमित्त मुलीकडे जेवणासाठी गेल्याने रात्री तेथेच थांबले होते. त्यांच्या घरासमोर उभी असलेली एमएच २० एबी ११०५ क्रमांकाची होंडा स्प्लेंडर दुचाकी चोरट्यांनी लंपास केली, मात्र पेट्रोल संपल्याने चोरट्यांनी ती गोळेगाव रस्त्यावरील एका शेतात सोडून पलायन केले.
दरम्यान, नारायण पाडळे यांच्या घराबाहेर रात्री आवाज आल्याने त्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता, गल्लीत सात ते आठ जण फिरताना दिसले. त्यांनी आरडाओरडा केल्याने गावात खळबळ उडाली. ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख नागेश लांडगे यांनी तत्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेवरून फोन करून संपूर्ण गावाला सतर्क केले. त्यामुळे ग्रामस्थांनी रात्रभर जागून पहारा दिला. या सतर्कतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला. नागेश लांडगे यांच्या तत्परतेचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
पोलिस चौकीची मागणी
उंडणगावात मागील वर्षभरापासून चोरीच्या घटना वाढल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. सहा महिन्यांपूर्वी कैलास सणांसे यांच्या घरावरही चोरीची घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर वाढत्या चोऱ्या तसेच परिसरातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी उंडणगाव येथे स्वतंत्र पोलिस चौकी उभारावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
फॉरेन्सिक, श्वान पथकाला पाचारण
घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर इंगळे, बीट जमादार सांडू जाधव व पोलिस कॉन्स्टेबल सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर येथून फॉरेन्सिक पथक व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दिवसभर गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली; मात्र चोरटे कोणत्याही कॅमेऱ्यात कैद झाले नसल्याचे समोर आले. त्यामुळे चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.