Sillod residents immersed in devotion on the occasion of Ashadhi
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीनिमित्त सिल्लोड शहरात वारकरी बांधवांच्या वतीने टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात भव्य पालखी-दिंडी सोहळा उत्साहात पार पडला. या भक्तिमय सोहळ्यात माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी सहभागी होत दिंडीचे स्वागत केले आणि वारकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार सत्तार यांनी पालखीतील विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण केला. दिंडी प्रमुख ह.भ.प. मनोज महाराज भाग्यवंत यांचा त्यांनी सत्कार केला. त्यानंतर राज्यात समाधानकारक पाऊस पडावा, शेतकरी-कष्टकरी सुखी व्हावेत, वारकरी भाविकांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि महाराष्ट्रावर पांडुरंगाची कृपादृष्टी कायम राहावी, अशी प्रार्थना त्यांनी विठुरायाच्या चरणी केली.
यावेळी वारकरी बांधवांच्या वतीने ह.भ.प. मनोज महाराज भाग्यवंत यांच्या हस्ते आमदार अब्दुल सत्तार यांचाही सत्कार करण्यात आला. दरम्यान, तालुका शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीने प्रियदर्शनी चौकात भाविकांसाठी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार सत्तार यांनी या उपक्रमात सहभागी होत भाविकांना फराळाचे वाटप केले.
यावेळी उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नंदकिशोर सहारे, उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, सुदर्शन अग्रवाल, शहरप्रमुख मनोज झवर, दुर्गाताई पवार, मेघाताई शहा, सतीश ताठे, शंकरराव खांडवे, विशाल जाधव, सिद्धेश्वर आहेर, सुधाकर पाटील, अशोक बन्सोड, प्रशांत क्षीरसागर, नरेंद्र बापू पाटील, राजेंद्र ठोंबरे, शिवा टोम्पे, दुर्गेश जैस्वाल, प्रवीण कटारिया, अक्षय मगर, गौरव सहारे, दत्ता शेजुळ, जगन्नाथ कुदळ उपस्थित होते.