सलग दुसऱ्या दिवशी गारपीटीचा फटका file photo
छत्रपती संभाजीनगर

Sillod News : सलग दुसऱ्या दिवशी गारपीटीचा फटका

गव्हाली परिसरात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस, रब्बी पिकांचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

Sillod News: Hailstorm Strikes for the Second Consecutive Day

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील गव्हाली, निल्लोड, तळवाडा परिसरात गुरुवारी (दि.१९) दुपारी मेघगर्जनेसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. रात्री आठच्या सुमारास शहरासह पळशी, उपळी, केहऱ्हाळा, धानोरा, लोणवाडी परिसरात अचानक मेघगर्जनेसह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

तालुक्यात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, उकाडा वाढला आहे. गुरुवारी दुपारी गव्हाली, तलवाडा, निल्लोड परिसरात जोरदार अवकाळी पाऊस झाला. यात गारांचा पाऊस झाल्याने सोंगणीला आलेले गहू, हरभरा, कांदा, सूर्यफूल, मका पिकांचे मोठे नुकसान झाले. सोंगणी केलेल्या मकाचा चारा भिजला असून, वादळी वाऱ्यामुळे गव्हाचे पीक आडवे झाले.

तालुक्यात बुधवारी सायंकाळीही घाटनांद्रा, धारला, चारनेर, पेंडगाव, धावडा, चिंचवण, आमठाणा, अजिंठा, अनाड, अंभई, रेलगाव, नानेगाव, सिरसाळा, घटांब्री, पांगरी आदी परिसरात अवकाळी पाऊस झाला होता.

तर यात घाटनांद्रा परिसरात गारपीट झाल्याने रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. खरीप हंगामातही पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला होता. त्यात आता पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांवर अस्मानी पाठोपाठ सुल्तानी संकट ओढवले आहे. दरम्यान भाजपचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मोठे यांनी महसूल विभागाशी संपर्क साधता पंचनामा करण्याची मागणी केली.

खरीप हंगामातही सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी यातून सावरत असताना आता पुन्हा अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. शासनाने पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी.
श्रींधर शिंदे, शेतकरी, गव्हाली

सुलतानपूरला गहू भुईसपाट

सुलतानपूर : खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूरसह भांडेगाव, खांडी पिंपळगाव, माटरगाव, कानडगाव, देवळाना व वडोद परिसरात बुधवारी (दि.१८) रात्री दहा वाजेच्या सुमारास झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, विशेषतः गव्हाचे पीक पूर्णपणे भुईसपाट झाले आहे.

या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले असून, मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित पाहणी करून नुकसानीचा अंदाज घ्यावा व शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

खंडाळा परिसरात गव्हाचे नुकसान

खंडाळा : वैजापूर तालुक्यातील खंडाळा परिसरात साडेदहा वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह गाराच्या पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. गहू सुकण्यासाठी टाकलेला असताना पावसाने हजेरी लावल्याने ऐन वेळेवर शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT