Sillod Political News : महायुतीतील तिन्ही पक्षांचा स्वबळाचा नारा  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sillod Political News : महायुतीतील तिन्ही पक्षांचा स्वबळाचा नारा

सिल्लोड : नगरपरिषद निवडणूक, भाजपसह इतर पक्षांची कसोटी, नव्या चेहऱ्यांना संधी

पुढारी वृत्तसेवा

Sillod Municipal Council Elections NCP, BJP, SHIV SENA

राजु वैष्णव

सिल्लोड : राज्याच्या सत्तेत सुरात सूर असलेल्या महायुतीमधील शिवसेना (शिंदे गट), भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांनी होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. शिवसेनेने तर नगराध्यक्षपदासाठी उमेदवार जाहीर करीत शहरात प्रचार कार्यालयाचे उद्घाटनही केले आहे.

भाजपने आधीच कंबर कसली असून, राष्ट्रवादी काँगेसनेही आता तयारी सुरू केली आहे. सोमवारी (दि. १०) उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. नगरपरिषदच्या १४ प्रभागांमधून २८ नगरसेवक निवडले जाणार आहे. शहरात ५४ हजार ८०० मतदार असून, प्रभाग रचना व आरक्षण सोडतीपासून इच्छुक कामाला लागलेले आहेत. निवडणूक जाहीर होण्याआधीच शिवसेनेचे आ. सत्तारांनी तयारी करीत स्वबळाचा नारा दिला. तर भाजपनेही आधीच कंबर कसलेली आहे. निवडणूक जाहीर होताच राष्ट्रवादी काँगेसनेही तयारी सुरू केली आहे.

या निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्षांसह महाविकास आघाडी, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी यांचे उमेदवार निवडणुकीत दिसणार आहेत. तर निवडणूक जाहीर झाल्यापासून गुलाबी थंडीत राजकारणाला चांगलीच ऊब मिळत आहे. दीड-दोन वर्षांचा कार्यकाळ सोडला तर नगरपरिषदवर स्थापनेपासून आ. अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व राहिलेले आहे.

गेली निवडणूक आ. सत्तार काँग्रेसच्या पंजा निश ाणीवर लढले होते. तर ही निवडणूक पहिल्यांदा शिवसेनेच्या धनुष्यबाणावर बाणावर लढत आहेत. गेल्या निवडणुकीत आ. सत्तारांचे २४ तर भाजपचे अवघे २ नगर-सेवक निवडून आले होते. यावेळी नगराध्यक्षपदासह सर्व २८ नगर-सेवक निवडून आणण्याची रणनीती आ. सत्तारांनी आखली आहे. तसेच शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला तोडीसतोड उमेदवार देत नगरपरिषदमध्ये संख्या बळ वाढवण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. असे असले तरी भाजपकडेही मतदारांना आकर्षित करणारे मोठे चेहरे आहेत.

नव्या चेहऱ्यांना संधी

या निवडणुकीत नगरसेवकांच्या दोन जागा वाढलेल्या आहेत. यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. असे असले तरी शिवसेनेकडून किती जुन्या तर किती नव्या चेहऱ्यांना संधी दिले जाते, याकडे मतदारांचे लक्ष लागलेले आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची मनधरणी केली जात असून, सोशल मीडियावर सध्या भावी नगरसेवकांना भलताच ऊत आला आहे. नगरपरिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, जोमाने कामाला लागले आहे. तर प्रचाराचा धुराळा आतापासूनच पाहायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT