

Maratha community's Jode Maro movement in Phulambri
फुलंब्री, पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट नुकताच उघड झाला असून, सोशल मीडियावर रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर फुलंब्री तालुक्यातील मराठा समाजबांधव आक्रमक झाले. त्यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करत फुलंब्री पोलिसांना निवेदन देण्यात आले.
समाजबांधवांची येथील बाजार समितीत बैठक झाली. त्यानंतर अर्धा तास आंदोलन करत धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. पोलिस निरीक्षक संजय सहाने यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, मनोज जरांगे पाटील यांना जिवे मारण्यासाठी कटकारस्थान करणाऱ्या आ. धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा, तसेच जे कोणी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा सर्वांना अटक करा.
आता मनोज जरांगे यांच्या जीवास धोका असून, त्यांना तात्काळ झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून मुख्य आरोपीस अटक न झाल्यास येत्या आठ दिवसांनंतर फुलंब्री तालुक्याच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा पोलिस प्रशासनाला निवेदनाव्दारे दिला आहे.