Sillod Crime News : घरफोडीतील तीन सराईत आरोपींच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या file photo
छत्रपती संभाजीनगर

Sillod Crime News : घरफोडीतील तीन सराईत आरोपींच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या

सिल्लोड : शिक्षक कॉलनीतील घरफोडी प्रकरण, दोन लाखांचे दागिने जप्त

पुढारी वृत्तसेवा

Sillod: House burglary case in Teachers' Colony; jewelry worth two lakh rupees seized

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : ग्रेड पोलिस उपनिरीक्षकांच्या घरात घुसून बेडरूममधील कपाटातून सोन्याचे दागिने घेऊन पळून जाणाऱ्या घरफोडी प्रकरणातील तीन सराईत आरोपींच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. यातील एकाला भिवंडी (ठाणे), तर दोघांना भुसावळ (जळगाव) येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. घरफोडीच्या रात्रीच पोलिसांनी दोघांना पकडले होते. तर एक पसार झाला होता. आता या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढून पाच झाली आहे.

आरीफ ऊर्फ केला शफी अन्सारी (३६, रा. ब्रिजलाल, केसवाणी बिल्डिंग ६४०, शास्त्रीनगर, स्टार हॉस्पिटल कल्याण रोड, भिवंडी, ठाणे), कैलास अशोक अग्रवाल (४२), प्रवीण अशोक अग्रवाल (३८, दोघे रा. शिवाजीनगर, वरणगाव रोड भुसावल) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. तर यापूर्वी सुरेश अशोक भोंगे उर्फ मोहमंद फरान शेख (३०, रा. रजिया टॉवर, पापानगर, भुसावल), अब्दुल रफिक हमीद अन्सारी (२९, रा. हनुमाननगर गोरेगाव, ईस्ट मुंबई) या दोघांना ताब्यात घेतलेले आहे.

गुरुवारी (दि. २३) रात्री फिर्यादी महिला मुलांसह झोपेत असताना गेट उघडण्याचा आवाज आला. पती आले असावे म्हणून महिला उठली, तर यादरम्यान बेडरूममधून आवाज आला. यामुळे महिलेला शंका आली. त्यांनी ही माहिती रात्रीच्या गस्तीवर असलेले पती (ग्रेड पोलिस उपनिरीक्षक) यांना दिली. ग्रेड पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र साळवे, पोलिस कर्मचारी योगेश मोकळे यांनी शिक्षक कॉलनीत धाव घेतली.

घरातील गेटमधून तिघे बाहेर येताना पोलिसांना दिसले. यातील आरोपी सुरेश भोंबेला पोलिसांनी झडप टाकून पकडले. तर दोघे पळून गेले. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कायंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पसार आरोपींची शोध मोहीम राबवली. यादरम्यान दुसरा आरोपी अब्दुल रफिक एका गाडीखाली लपून बसलेला असताना पोलिसांनी त्याला पकडले होते. तर आरोपींकडून माहिती काढत पुन्हा शहर पोलिसांच्या पथकाने वरील तिघांना ताब्यात घेतले आहे. आरोपींना दुचाकी देऊन घरफोडीला प्रोत्साहन दिल्याने पोलिसांनी आरोपी अग्रवाल भावांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे, पोलिस कर्मचारी बारकू तडवी, बाबासाहेब राठोड, विकास दुबेले, अर्जुन जोनवाळ, समाधान भागिले यांनी केली. दरम्यान, आरोपींना गुरुवारी न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश सिल्लोड न्यायालयाने दिले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दोन लाखांचे दागिने जप्त

दरम्यान, पसार झालेला आरोपी आरीफ ऊर्फ केला शफी अन्सारी याच्या ताब्यातून पोलिसांनी सोने-चांदीचे जवळपास दोन लाखांचे (आजची किंमत) दागिने जप्त केले. शिवाय दाराचा कोयंडा तोडण्यासाठी वापरला जाणारा एक सेटिंगचा पान्हाही जप्त केला आहे. आरोपी घरफोडी करताना शेजारील घरातील कुणी बाहेर येऊ नये म्हणून बाहेरून घराची कडी लावून घेत होते, असेही तपासात समोर आले आहे.

अनेक गुन्हे दाखल

यातील सर्व पाचही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. सुरेश भोंगेवर भुसावळ, वर्धा, अकोला येथे पाकीटमार, घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत, तर अब्दुल रफिक, आरीफ ऊर्फ केलावर घाटकोपर, भिवंडी, गोरेगाव वेस्ट, मुंबई येथे घरफोडी, सोनसाखळी ओरबाडण्याचे तर अग्रवाल भावांवर भुसावळ येथे गुटखा तस्करीसह अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT