सिल्लोड : बसस्थानकावरील उपाहागृहात अस्वच्छता आढळून आली नाही.  (छाया : राजू वैष्णव)
छत्रपती संभाजीनगर

Sillod food safety action : सिल्लोड बसस्थानकावरील उपाहारगृहाचा परवाना निलंबित

अन्न व भेसळ विभागाच्या पाहणीत गंभीर त्रुटी

पुढारी वृत्तसेवा

सिल्लोड : येथील बसस्थानकावरील उपहारगृहाचा परवाना अन्न व भेसळ विभागाने निलंबित केला आहे. मंगळवारी (दि.४) अन्न व भेसळ विभागाने या उपाहारगृहाची पाहणी केली असता उपहारगृहात गंभीर त्रुटी आढळल्याने परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.

सध्या राज्यात अन्न व भेसळ विभागाने धडक कारवाया हाती घेतलेल्या असून, या अनुषंगाने सिल्लोड शहरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत प्रत्यक्ष पाहणीत बसस्थानकावरील उपहारगृहात अस्वच्छ फरशी, धूळ, माती साचलेली होती. तसेच वेष्टने आणि पॅकेजिंग साहित्यासारखा कचरा संपूर्ण फरशीवर विखुरलेला आढळला. भिंतींची दुरवस्था आढळून आली. भिंतींचे पापुद्रे निघत असून, रंग उडालेला आहे आणि भिंती काळ्या पडल्या आहेत.

खिडक्यांना जाळी नाही. कीटक आणि उंदरांसारख्या प्राण्यांना आत येण्यापासून रोखण्यासाठी खिडक्यांना लोखंडी जाळी बसवलेली नाही. परवाना फलक दिसला नाही. एफएसएसएआय परवाना आस्थापनेमध्ये कोणत्याही ठळक किंवा दर्शनी भागात लावलेला आढळला नाही. पाणी तपासणीदरम्यान कोणताही अलीकडचा किंवा चालू काळातील पाणी तपासणी अहवाल उपलब्ध नाही.

भांडी घासण्याची जागा अस्वच्छ, कचरा आणि खरकट्या भांड्यांची धुण्याची जागा अत्यंत घाणेरडी दिसून आली. तिथे चिखलाचे व निसरडे डाग पडलेले आहेत. त्यामुळे तिथे मांडी स्वच्छ व आरोग्यदायी पद्धतीने धुणे अशक्य आहे. चिप्स, नमकीन आणि इतर खाद्यपदार्थांच्या खरेदीची नोंद उपलब्ध आढळली नाही. खरेदी मालाचे रेकॉर्ड तपासणीवेळी सादर करता आले नाही. स्वच्छतेचा अभाव दिसून आला.

संपूर्ण परिसरात, भिंतींवर, फरशीवर आणि स्वयंपाकघरात कुठेही समाधानकारक स्वच्छता आढळली नाही. जागोजागी डाग, अन्नपदार्थांचा कचरा आणि चिखलामुळे स्वयंपाकघर अत्यंत अस्वच्छता दिसून आली. या गंभीर त्रुटींमुळे सदरील उपहारगृहाचा परवाना निलंबित करण्यात आला असून, या उपहारगृहात सुधारणा करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. सुधारणा झाल्यास पुढील परवाना देण्याबाबत विचार केला जाईल, असे अन्न व भेसळ विभागाचे सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांनी सांगितले.

ही कारवाईच अन्न व भेसळ विभागाचे सहाय्यक आयुक्त विवेक पाटील, सहआयुक्त श्रीकांत करनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी फरीद सिद्दिकी, प्रशांत अजिंठेकर यांनी केली.

व्यावसायिकांमध्ये खळबळ

बसस्थानकावरील उपगृहावर कारवाई केल्याने व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मात्र एफडीएने बसस्थानकावरील उपगृहावर कारवाई केल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. शहरात तसेच छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अनेक हॉटेल आहेत. यांची तपासणी न करता बसस्थानकावरील उपगृहाचीच तपासणी का करण्यात आली ? हे मात्र कोडेच असून, एका सुजाण नागरिकाच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT