Ganesha in Verul Caves : वेरूळातील लेण्यांमध्ये गणरायाचे दर्शन  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Ganesha in Verul Caves : वेरूळातील लेण्यांमध्ये गणरायाचे दर्शन

वेरूळ हा 34 लेण्यांचा असलेला समूह. वेरूळातील लेणी क्रमांक 14 मध्ये सप्तमातृका शिल्पात गणपतीचा समावेश आहे.

पुढारी वृत्तसेवा

Sighting of Lord Ganesha in the caves of Verula

छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध वेरूळ लेण्या पाहण्यासाठी देश, विदेशातील पर्यटक हजारोंच्या संख्येने येतात. या लेण्यांच्या सौदंर्याने मोहित होतात. हिंदू, बौद्ध, जैन संस्कृतीचे दर्शन त्यांना लेण्या पाहताना घडते. या लेण्यात अनेक ठिकाणी गणरायाच्या शिल्पाचेही दर्शन घडते.

वेरूळ हा 34 लेण्यांचा असलेला समूह. वेरूळातील लेणी क्रमांक 14 मध्ये सप्तमातृका शिल्पात गणपतीचा समावेश आहे. वेरूळचे आकर्षण असलेल्या कैलास लेण्यात गर्भगृहाजवळ आणि प्रदक्षिणा मार्गावर गणेशाच्या मूर्ती आहेत.

दशावतार लेणी क्रमांक 15 मध्ये मुख्य गर्भगृहाच्या बाहेर गणेश शिल्प आढळते. लेणी क्रमांक 21, 22 मध्येही आपणास गणपती विराजमान दिसतील. यासंबंधीची सविस्तर माहिती विश्वकोषातही नमूद करण्यात आली आहे. त्यात म्हटले की, लेणी क्रमांक 13 ते 29 ही हिंदू धर्मीयांची आहेत. ही सर्वसाधारणपणे सहाव्या ते आठव्या शतकांतील निर्मिती आहे.

यात शैव शिल्पांची आणि शिवाच्या जीवनातील प्रसंगांच्या शिल्पपटांची संख्या अधिक असून वैष्णव शिल्पे तुलनात्मक दृष्ट्या कमी आहेत. लेणी क्रमांक 14 हा कैलास लेण्यांचा परिसर असून मुख्य मंदिराच्या दरवाज्याजवळ स्त्री-द्वारपाल असून त्यांच्या बाजूसच मकरावर उभी गंगा, कूर्मावर उभी यमुना आणि भव्य द्वारपाल यांची शिल्पे आहेत.

येथे प्रदक्षिणापथ असून त्याच्या भिंतीत शिल्पपट, शिल्पे आणि शिल्पसमूह आहेत. यांत उत्तरेकडील भिंतीत सालंकृत व बालकांसहित सप्तमातृका असून त्या वीरभद्र आणि गणेश या दोहोंच्या मधे आहेत. लेणी क्रमांक 15 दुमजली असून, भिंतीत कोनाडे आहेत. त्यांत गणेश, शिव - पार्वतीची आलिंगन-मूर्ती, सूर्य, शिव- पार्वती, गजानन-गण, महिषादुरमर्दिनी, अर्धनारीनटेश्वर, दुर्गा, तपस्वी उमा, गणेश, काली इत्यादी मूर्ती आहेत.

मोरावर बसलेला कार्तिकेय

लेणी क्रमांक 21 हे लेणे रामेश्वर’ लेणे म्हणून ओळखले जाते. सभामंडपाच्या दोन्ही बाजूंस उंच जोत्यावर दोन लहान उपवर्णक असून, त्यांत डाव्या बाजूला शिव-पार्वतीचा विवाहसोहळा दाखविलेला आहे. पंचाग्निसाधन करणारी उमा, हिमालयाकडे उमामहेश्वरांचा विवाहप्रस्ताव घेऊन गेलेला ब्रह्मा आणि शिव-पार्वती विवाह (कल्याणसुंदर) हे तिन्ही पट अप्रतिम आहेत. विशेषतः विवाहप्रसंगी पार्वतीच्या चेहर्यावर दर्शविलेला सलज्ज भाव अत्यंत विलोभनीय आहे. याशिवाय महिषासुरमर्दिनी आणि मोरावर बसलेला कार्तिकेय यांची शिल्पे आहेत.नीलकंठ या नावाने ओळखल्या जाणार्या लेण्यात मातृकांची शिल्पे आहेत. शिवाय गणेश, कार्तिकेय, गजलक्ष्मी आणि कमलासना देवी यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात शिवलिंग आहे....

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT