छत्रपती संभाजीनगर : सिध्दार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय आणि शहरातील प्रमुख उद्यानांनी महापालिकेच्या महसुलात लक्षणीय भर घातली असून, प्राणिसंग्रहालयाने उत्पन्नाच्या बाबतीत आघाडी घेतली आहे. गेल्या वर्षभरात प्राणिसंग्रहालयातून तब्बल २ कोटी ९८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले, तर शहरातील पाच प्रमुख उद्यानांतून १ कोटी ८६ लाख रुपयांचा महसूल जमा झाला असल्याची माहिती उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी दिली.
मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय म्हणून ओळख असलेल्या सिध्दार्थ उद्यानातील प्राणिसंग्रालयात सिंह, वाघ यासह सुमारे ३७५ प्राण्यांचा समावेश आहे. विविध जिल्ह्यांमधून येणारे पर्यटक, विद्यार्थ्यांच्या सहली आणि स्थानिक नागरिकांमुळे येथे वर्षभर गर्दी असते. प्राण्यांच्या आकर्षणामुळे विशेषतः सुटीच्या काळात प्रेक्षकांची संख्या लक्षणीय वाढते.
याचाच परिणाम म्हणून तिकीट विक्रीतून मोठा महसूल मिळाला असून, जानेवारी महिन्यात सर्वाधिक ४६.५८ लाख, तर डिसेंबरमध्ये ४२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. तसेच प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनातही काटेकोर नियोजन केले जात असून, उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राण्यांची निगा आणि सुविधा प्रभावीपणे राखल्या जात आहेत. दरम्यान, शहरातील विरंगुळ्याचे प्रमुख केंद्र ठरलेल्या सिद्धार्थ उद्यानासह इतर उद्यानांनाही नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
शाळांच्या सुट्या, सणासुदीचे दिवस यावेळी उद्यानांमध्ये प्रचंड गर्दी होत असून, मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी विविध सुविधा येथे उपलब्ध आहेत. स्वच्छता, सुरक्षा, पिण्याचे पाणी आणि आकर्षक मनोरंजन साधनांमुळे उद्यानांचे महत्त्व वाढले आहे. उद्यान विभागाने शहरातील सर्व हिरवळ केंद्रांची योग्य देखभाल केल्यामुळेच नागरिकांचा ओढा वाढला असून, याचा थेट फायदा महापालिकेच्या महसुलात झाल्याचे यावरून दिसून येत आहे.
पाच उद्यानांतून १.८६ कोटींची कमाई
सिद्धार्थ उद्यानातून सर्वाधिक १ कोटी ४५ लाख रुपयांचे उत्पन्न झाले आहे. त्याखालोखाल बाळासाहेब ठाकरे बॉटनिकल उद्यानातून १७.६७ लाख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तारांगण उद्यानातून ११.४३ लाख, महाराणा प्रतापसिंह उद्यानातून १२.०९ लाख, तर कमल तलावातून सुमारे ४९ हजार रुपयांची कमाई झाली आहे.