छत्रपती संभाजीनगर : जंगलाचा राजा आता पुन्हा एकदा सिद्धार्थ उद्यानात दाखल झाला असून, तब्बल १४ वर्षांनंतर येथे सिंहगर्जना ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिक व पर्यटकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. बुधवार, १ ऑक्टोबरपासून सिंह, अस्वल आणि कोल्हे प्रेक्षकांसाठी खुले होणार आहेत. त्यापूर्वी मंगळवारी (दि.३०) या सर्व प्राण्यांची महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी पाहणी केली. प्राणी पूर्णपणे निरोगी असून, स्थानिक हवामानाशी जुळवून घेण्यासाठी त्यांना तात्पुरत्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते.
कर्नाटकातील शिवमोगा प्राणिसंग्रहालयातून सिध्दार्थ उद्यानात सिंहाची जोडी अर्जुन (८ वर्षे) आणि सुचित्रा (१० वर्षे) यांचे आगमन झाले आहे. त्याचबरोबर अस्वलांची जोडी गजेंद्र (४ वर्षे) व शांती (५ वर्षे) आणि दोन कोल्हेही आणण्यात आले आहेत. या सर्व प्राण्यांना स्थानिक हवामानाशी जुळ-वून घेण्यासाठी त्यांना तात्पुरत्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. आता ते प्रेक्षकांसाठी आजपासून खुले करण्यात येणार आहेत. या नव्या प्राण्यांच्या समावेशामुळे सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयाचे आकर्षण अधिक वाढले असून, शहरवासीयांसह पर्यटकांसाठी हे एक नवे आकर्षण ठरणार आहे.
शिवमोग्गाला एक पांढरा, दोन पिवळ्या वाघिणी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या मंजुरीनुसार, २७ सप्टेंबर रोजी सिध्दार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयातून एक पांढरा नर वाघ आणि दोन पिवळ्या वाघिणी शिवमोगा प्राणिसंग्रहालयाकडे पाठविण्यात आल्या. त्याच्या बदल्यात सिंह, अस्वल आणि कोल्ह्यांचे आगमन झाले आहे.
प्रशासकांचा सिंहाचा वाटा
सिद्धार्थ उद्यानात सिंह दाखल व्हावेत यासाठी आयुक्त तसेच प्रशासक जी. श्रीकांत यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांचा पुरोगामी दृष्टिकोन आणि अथक परिश्रमामुळेच १४ वर्षांनंतर सिंह पुन्हा या प्राणिसंग्रहालयात दाखल झाले आहेत.
या प्राण्यांना भाषेची अडचण
कर्नाटकातील शिवमोग्गा प्राणिसंग्रालयात लहानाचे माठे झालेल्या सिंह, अस्वल आणि कोल्हा या प्राण्यांना तेथील हॅण्डलर कन्नडी भाषेत बोलत असत. त्यामुळे या प्राण्यांना येथील भाषा लवकर कळत नसून, लवकरच तेही माझ्यासारखे येथील भाषेला अवगत करतील, अशी मिश्किल टिप्पणी जी. श्रीकांत यांनी केली.