Shri Jagannath Rath Yatra : श्रद्धेने उजळली श्री जगन्नाथ रथयात्रा file photo
छत्रपती संभाजीनगर

Shri Jagannath Rath Yatra : श्रद्धेने उजळली श्री जगन्नाथ रथयात्रा

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) संस्थापक आचार्य ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या छत्रपती संभाजीनगर शाखेतर्फे रविवारी (दि. १९) वरूड फाटा परिसरात श्री जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

पुढारी वृत्तसेवा

Shri Jagannath Rath Yatra illuminated by devotion

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) संस्थापक आचार्य ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या छत्रपती संभाजीनगर शाखेतर्फे रविवारी (दि. १९) वरूड फाटा परिसरात श्री जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जे अत्यंत श्रद्धा, उत्साह आणि भव्यतेने पार पडले. या पवित्र प्रसंगी सुमारे 1500 भाविकांनी सहभाग घेत भगवान श्री जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा महाराणी यांचे दर्शन घेतले.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9:00 वाजता भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा महाराणी यांच्या आरतीने झाली. याप्रसंगी एन. के. गुप्ता यांची विशेष उपस्थिती लाभली. विविध सुगंधी फुलांनी सजवलेल्या रथाची आकर्षक सजावट करण्यात आली होती. शेकडो भाविकांनी उत्साहाने रथ ओढून आपली भक्ती अर्पण केली. "हरे कृष्ण" महामंत्राच्या संकीर्तनाने संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि आनंदमय झाले.

रथयात्रेच्या मार्गावर भाविकांनी रांगोळ्या काढून तसेच मार्ग गोमय जलाने शुद्ध करून भगवान श्री जगन्नाथ यांचे स्वागत केले. अनेकांनी आपल्या घरांच्या दारावर तोरण सजवून प्रभुंच्या आगमनाचा उत्सव साजरा केला. हा देखावा सर्वसामान्यांसाठीही प्रेरणादायी ठरला, कारण भाविकांनी आपल्या परिसराला स्वच्छ व पवित्र ठेवून भगवंतांच्या स्वागताची भावना साकार केली. रथयात्रेदरम्यान भगवद्गीता तसेच इतर आध्यात्मिक पुस्तकांचे वितरण करण्यात आले आणि सर्वांना मंदिरातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी सादर आमंत्रण देण्यात आले.

रथयात्रेनंतर मंदिरात भगवान श्री जगन्नाथ यांना 56 प्रकारचे भोग अर्पण करण्यात आले. यावेळी इस्कॉन छत्रपती संभाजीनगर मंदिराचे अध्यक्ष डॉ. रोहिणीप्रियप्रभूनी प्रेरणादायी प्रवचन दिले. प्रवचनानंतर भगवान श्री जगन्नाथ यांची महाआरती करण्यात आली. तिची समाप्ती हरे कृष्ण महामंत्रावर सर्व भाविकांनी केलेल्या आनंदमय नृत्याने झाली. कार्यक्रमाची सांगता सर्व उपस्थितांना प्रेमपूर्वक महाप्रसाद वितरणाने करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT