Shooter Merchant died in Harsul jail.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : संगीत क्षेत्रातील दिग्गज आणि टी-सीरीजचे मालक गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात शूटर अब्दुल रऊफ मर्चेंट (६०) याचा गुरुवारी (दि.८) सकाळी मृत्यू झाला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कारागृह प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रऊफ मर्चेंटची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. ३० डिसेंबर रोजी त्याला सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने ४ जानेवारी रोजी त्याला पुन्हा कारागृहात आणले गेले. मात्र गुरुवारी सकाळी पुन्हा त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने घाटी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हर्सल कारागृह अधीक्षक खामकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
आठ वर्षे फरार
अब्दुल मर्चेंट याला २००९ मध्ये पॅरोलवर (रजा) सोडण्यात आले होते. हर्सल जेलमधून बाहेर पडल्यानंतर तो पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता. तब्बल आठ वर्षे तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गायब होता. २०१६-१७ च्या सुमारास पोलिसांनी त्याला पुन्हा बेड्या ठोकल्या आणि त्याची रवानगी हसूल कारागृहात करण्यात आली होती. तेव्हापासून तो आपली उर्वरित शिक्षा भोगत होता.
काय होते गुलशन कुमार हत्याकांड ?
१२ ऑगस्ट १९९७ रोजी मुंबईत गुलशन कुमार यांची एका मंदिराबाहेर अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली होती. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा हस्तक असलेल्या अब्दुल रऊफ मर्चेंटने गुलशन कुमार यांच्यावर तब्बल १६ राऊंड फायरिंग केले होते. या खळबळजनक हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरला होता. या गुन्ह्यात मर्चेंटला २००२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. २००३ मध्ये त्याची रवानगी येरवडा कारागृहातून छत्रपती संभाजीनगरच्या हसूल कारागृहात करण्यात आली.