Shock of very high voltage cable wires; A 13-year-old boy suffered severe burns
बिडकीन, पुढारी वृत्तसेवा : बिडकीन येथील जगदंबानगर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी अति उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या तारांचा स्पर्श झाल्याने १३ वर्षीय मुलगा गंभीररीत्या भाजल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. विशाल दिनेश सेनानी (वय १३, रा. मध्य प्रदेश, हल्ली मुक्काम जगदंबानगर, बिडकीन) असे जखमी मुलाचे नाव आहे.
एका घराच्या बांधकामाजवळून उच्चदाबाची विद्युत वाहिनी गेली आहे. बांधकामाच्या ठिकाणी असताना विशालचा विद्युत वाहिनीच्या तारांशी संपर्क आल्याने त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. या दुर्घटनेत त्याचा हाताचा पंजा मोठ्या प्रमाणात भाजला असून दोन्ही पाय, पोट तसेच शरीराच्या अन्य भागांवरही गंभीर भाजल्याच्या जखमा झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने विशालला बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
आधीही घडल्या घटना ?
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, याच बांधकामाच्या ठिकाणी यापूर्वी दोन ते तीन वेळा उच्चदाबाच्या विद्युत तारांशी संबंधित धोकादायक घटना घडल्या होत्या. त्या वेळी मोठा अनर्थ टळला. मात्र, विद्युत वाहिनीच्या धोक्याबाबत सूचना देऊनही आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, बांधकामाच्या ठिकाणी उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीपासून सुरक्षित अंतर ठेवण्यात आले होते का, आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
बिडकीनमध्ये अनेक ठिकाणी धोकादायक स्थिती
बिडकीनपरिसरातील औदुंबरनगर, जगदंबानगर, न्यू गणेशनगर परिसर, डिलक्स पार्कलगत तसेच दक्षिण बिडकीनमधील काही नवीन वसाहतींमध्ये उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्या बांधकामांच्या जवळून जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे बांधकाम मजूर, रहिवासी तसेच परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
बिडकीन परिसरात मोठ्या प्रमाणावर नवीन बांधकामे आणि वसाहती विकसित होत असताना उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या परिसरातील सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत का, याची तपासणी बांधकामांबाबत करण्याची मागणी जोर धरत आहे.
विद्युत विभागाकडून पाहणीची मागणी
१३ वर्षीय मुलाच्या दुर्घटनेनंतर संबंधित विद्युत वाहिनीची तातडीने पाहणी करून धोकादायक ठिकाणांची नोंद करावी, बांधकामांच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा अंतर आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना आहेत का, याची तपासणी करावी, तसेच नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेने बिडकीन परिसरातील उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला