Shivshahi blocked the city's lifeline
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराची लाईफ लाईन असलेल्या जालना रोडवर गुरुवारी (दि.४) दुपारी ११.३० च्या सुमारास मोंढा नाका उड्डाणपूल चढतानाच शिवशाही बस बंद पडल्याने उड्डाण पूल आणि बाजूच्या सस्त्यावर वाहनधारकांना तब्बल अर्धा तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. फॅन बेल्ट तुटला होता. माहिती मिळताच बसची दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, अशी माहिती एसटीच्या वतीने देण्यात आली.
रेडी टू पार्क बस प्रवाशांच्या सेवेत जात असतानाच ब्रेक डाऊन होण्याच्या घटनांत वाढ होत आहे. त्यामुळे एसटीच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा पुन्हा ऐरणीवर येत आहे. असाच प्रकार गुरुवारी सकाळी ११.३० च्या सुमारास घडला. मुख्य बसस्थानक आगाराची असलेली छत्रपती संभाजीनगर-अकोला (एमएच-०९ ईएम-८७२३) शिवशाही बस ही मुख्य बसस्थानकातून सिडकोकडे जात असताना मोंढा नाका उड्डाणपुलावर चढतानाच अचानक बंद पडली.
त्यामुळे काही वेळातच वाहतूक कोंडीला सुरुवात झाली. बस बंद पडल्याने दूध डेअरीपासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. दरम्यान एसटीच्या मेकॅनिकने गाडी दुरुस्त केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
दरम्यान, अनेक वाहनधारकांनी वाहतूक कोंडीतून रस्ता काढण्यासाठी दुधडेअरी ते खोकडपुरा आणि उड्डाणपूल ते तारभवन या अंतर्गत रस्त्यावरून वाहन नेण्याचा प्रयत्न केला, परंतु तेथेही अचानक वाहनांची संख्या वाढल्याने त्याही रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.