

Cyber fraud again in the name of Vishwas Nangre Patil
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मी विश्वास नांगरे पाटील बोलतो, तुम्ही कॅनरा बँकेत माझ्या नावाने अडीच कोटींचा घोटाळा केला आहे, असे व्हिडिओ कॉलवर धमकावत सायबर भामट्याने महावितरणच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडून तब्बल ४६ लाख रुपये उकळले. हा प्रकार ४ ते ११ ऑगस्टदरम्यान शहानूरवाडी भागात घडला.
७२ वर्षीय फिर्यादी हे महावितरणमधून सेवानिवृत्त झाले असून, ते शहानूरवाडी भागात एकटेच राहतात. त्यांना ४ ऑगस्टला दुपारी व्हॉटसअॅपवर व्हिडिओ कॉल आला. मी विश्वास नांगरे पाटील बोलतो, माझ्या नावाने तुम्ही कॅनरा बँकेत खाते उघडून अडीच कोटींचा फ्रॉड केला आहे. त्यामुळे तुम्ही तुमची एफडी सरेंडर करा व आम्ही दिलेल्या बँकेत आरटीजीएसने पैसे भरा, असे सांगितले. या कॉलमुळे वृद्ध घाबरून गेला.
त्यांनी भामट्याने दिलेल्या हरियाणा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या बँक खात्यात ४ आणि १० लाखांचे आरटीजीएस केले. त्यानंतर चार दिवसांनी पुन्हा विश्वास नांगरे पाटील बोलतोय म्हणत भामट्याने व्हिडिओ कॉल केला. त्याने फोटो वॉरंट, ईडी वारंट व्हॉट्सअॅपआर पाठवले. त्यामुळे वृद्ध हादरून गेला. त्याने कोणालाही याबाबत काही सांगितले नाही. भामट्याने त्यांना सुबरजित मिश्रा नावाच्या व्यक्तीचा बँक खाते क्रमांक देऊन ३२ लाखांचे आरटीजीएस करण्यास सांगितल्याने वृद्धाने पैसे पाठवून दिले. तीन टप्प्यांत ४६ लाख रुपये भामट्याने उकळले.
चौकशी पूर्ण झाल्यावर तुमचे पैसे परत मिळतील, असे विश्वास नांगरे पाटील नावाच्या व्यक्तीने सांगितले. वृद्धाला फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सायबर पोर्टलवर तक्रार नोंदविली. त्यानंतर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्ह दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन कुंभार करत आहेत.
वृद्धाला विश्वास नांगरे पाटील नावाने व्हिडिओ कॉल आला. तेव्हा तुमची चौकशी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ११ ऑगस्टपर्यंत पैसे परत मिळतील. याची कोठेही वाच्यता केली, पोलिसांत गेलात, बँकेत गेलात तर तुम्हाला ९० दिवसांची जेल होईल. नॅशनल सेक्युरिटी अॅक्टनुसार तुमचे घर, मोबाईल सील करण्यात येईल. तुम्ही सहकार्य नाही केले तर आणखी ६ महिन्यांची जेल होईल, अशी धमकी दिली. त्याच्यासोबत संदीप रॉय, राहुलकुमार शर्मा असे तपास अधिकारी होते. परंतु त्यांचे चेहरे वृद्धाला दिसत नव्हते.
जुलै महिन्यातच विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने एकाची फसवणूक झाली होती. तुमच्या खात्यातून दहशतवाद्याने मनी लॉड्रिंग केल्याने राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे. त्या दहशतवाद्याने तुम्हाला २० लाख रुपये दिले आहे. त्यामुळे तुम्हाला अटक होईल, असे ७७ वर्षीय वृद्धाला धमकावून तब्बल ७८ लाख ६० हजार रुपये उकळले होते. हा प्रकार २ जुलै ते ७ जुलैदरम्यान क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला होता.