छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शिवाजीनगर भुयारी मार्गीच्या दुरुस्तीचे काम सलग दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.९) ही सुरू राहिल्याने शहरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. दोन दिवसांपासून मार्ग बंद असल्याने वाहनधारकांना पर्यायी रस्त्याने पाच किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे. परिणामी सुटीच्या दिवशीही नागरिकांचा जीव अक्षरशः मेटाकुटीला आला.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्पांतर्गत शिवाजीनगर भुयारी मार्गाचे काम जी.एन.आय. कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत करण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात घाईघाईने लोकार्पण करून मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, मात्र अनेक कामे अपूर्ण ठेवून झालेल्या या उद्घाटनानंतर काही महिन्यांतच भुयारी मार्गीचे पितळ उघडे पडले.
पहिल्याच पावसाळ्यात मागात गळती लागली. आत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. पाणी उपसा करण्यासाठी कोणतीही कायमस्वरूपी यंत्रणा नव्हती. परिणामी, वाहनधारकांना पाण्यातूनच वाहने चालवावी लागली. निसरड्या रस्त्यामुळे अनेक अपघात घडले, तर काही जण जखमी झाले. नागरिकांच्या तक्रारींनंतर मनपाने अखेर लक्ष देत भुयारी मार्गाच्या स्वच्छतेसाठी आठ कर्मचाऱ्यांचे विशेष पथक आणि वाहने उपलब्ध करून दिली.
तथापि, मूळ समस्या कायम राहिलीच. पाण्यामुळे रस्त्याचे सिमेंट थर उखडले. त्यामुळे अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले. या दुरुस्तीकरिता शनिवारी आणि रविवारी भुयारी मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात आला. आज दुसऱ्या दिवशीही काम सुरू राहिल्याने, देवळाई चौक, संग्रामनगर उड्नुणपूलमार्गे गारखेडा, सिडको आणि हडको भागाकडे जाणाऱ्या वाहनधारकांना मोठा फेरा मारावा लागला. त्यामुळे वाहतुकीचा ताण वाढून नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली.
उशिरापर्यंत सुरू राहिले काम
रात्री उशिरापर्यंत काम सुरू राहिल्याचे चित्र दिसले. सिमेंट टाकण्याचे आणि नाले स्वच्छ करण्याचे काम पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी झटत होते. मात्र या कामानंतरही भुयारी मार्ग पुन्हा पूर्ववत कधी होणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
काम निकृष्ट, त्रास मात्र आम्हाला !
पावसाळ्यात पाणी साचले, रस्ता खराब झाला, आता पुन्हा दुरुस्ती, निकृष्ट कामाचा फटका आम्हालाच बसतो. दोन दिवस सुटी असूनही गाड्या वळवून पाच किलोमीटरचा फेरा मारावा लागतो, अशी प्रतिक्रिया स्थानिक वाहनचालकांनी दिली. काहींनी तर प्रशासनावरच उद्घाटनासाठी घाई, गुणवत्तेकडे दुर्लक्ष असा आरोप केला.