छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजी महाराज संग्रहालयाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खराब होत असल्याचं वास्तव समोर आलं आहे. शिवकालीन संपन्न वारसा, प्राचीन वस्तू आणि मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचं जतन करणारा हा महत्त्वाचा ठेवा मनपाच्या अति दुर्लक्षामुळे धोक्यात आल्याचं चित्र आहे.
शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी निगडित जवळपास ३ हजारांहून अधिक प्राचीन वस्तू या संग्रहालयात जतन करण्यात आल्या आहेत. तलवारी, कवच, नाणी, दुर्मिळ दप्तरं, शिवकालीन शस्त्रं, हस्तलिखिते अशा असंख्य वस्तूंमुळे हे संग्रहालय अभिमानाचं ठिकाण मानलं जातं. मात्र या वस्तूंचं संवर्धन करायला आवश्यक मनुष्यबळ, सुरक्षित दालनं आणि मूलभूत देखभाल उपकरणांची कमतरता असल्याने बहुमोल वारसा धोक्यात आहे.
संग्रहालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. अनेक दालने, मोजकेच कर्मचारी आणि रोज येणाऱ्या पर्यटकांची मोठी संख्यायामुळे वस्तूंची सफाई, संवर्धन, नोंदी ठेवणे, दालनांची दुरुस्ती याकडे योग्य लक्ष जात नाही.
काही दालनांमधील प्राचीन वस्तूंना धुळ चढली असून अनेक ठिकाणी संरक्षणासाठी आवश्यक असलेली काचसुद्धा नाही. वारशाचं जतन करणाऱ्या ठिकाणी अशी परिस्थिती पाहून इतिहासप्रेमी संतप्त आहेत.
दरवर्षी तब्बल 40 हजारांहून अधिक पर्यटक शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट देतात. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असूनही मनपाकडून कोणतेही नियोजनबद्ध लक्ष दिलं जात नाही. संग्रहालयाच्या सौंदर्यीकरणासाठी 1999 नंतर रंगरंगोटी किंवा नूतनीकरण झालं नाही, हे कटू सत्य पर्यटकांसमोर ठळकपणे जाणवतं.
काही दालनांचे छत झडलेलं, भिंतींवरील लाईट्स बंद, अनेक ठिकाणी ओलसरपणा, तर पावसाळ्यात काही वस्तूंवर ओल बसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. इतिहास जपणाऱ्या दालनांची अशी अवस्था पाहून पर्यटक निराश होऊन परत जातात.
स्थानिक नागरिक आणि इतिहासप्रेमींचा मनमानी आणि दुर्लक्षाबद्दल तीव्र स्वरात आक्रोश आहे. त्यांचा आरोप असा
राजकीय नेते सभा–समारंभात शिवरायांचं नाव घेतात
पण शिवकालीन वारसा जपण्यासाठी कोणतीही पावलं उचलत नाहीत
संग्रहालयाकडे बघण्यासही तयार नसल्याचं नागरिकांचं मत
इतिहासप्रेमींनी हेही निदर्शनास आणले की, महाराष्ट्रातील आणि विशेषतः मराठवाड्यातील शिवाजी महाराजांच्या आठवणी जपणारं हे संग्रहालय अशा अवस्थेत राहणं अत्यंत लाजिरवाणं आहे.
इतिहास प्रेमी तसेच स्थानिक नागरिकांची मागणी :
संग्रहालयाचं तातडीने पुनरुज्जीवन करावं
कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी
सर्व दालनांमध्ये संरक्षणात्मक काच, प्रकाशयोजना, ओलसरपणावर उपाय उपलब्ध करावेत
वारशाचे संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र निधी द्यावा
अन्यथा मराठ्यांच्या इतिहासातील हा अमूल्य वारसा पुढील काही वर्षांत नष्ट होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.