करमाड : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेंद्रा एमआयडीसी परिसरात बुधवारी (दि.29) सकाळी सात वाजेच्या सुमारास तिरुपती इंडस्ट्रीज या प्लास्टिकचा दाणा तयार करणाऱ्या कंपनीत भीषण आग लागली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळी सात वाजेच्या सुमारास कंपनीत कामकाज सुरू होण्याची वेळ होती. त्यामुळे त्यावेळी कारखान्यात कामगारांची उपस्थिती मर्यादित होती. आग लागल्याचे लक्षात येताच उपस्थित कामगारांनी प्रसंगावधान राखत तात्काळ बाहेर धाव घेतली. त्यांनी सुरक्षितपणे कंपनीच्या परिसरातून बाहेर पडण्यात यश मिळवले.
तात्काळ माहिती देण्यात आल्यानंतर शेंद्रा अग्निशामन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. कंपनीत पूर्णपणे कच्चे प्लास्टिक असल्याने आगीचे लोळ प्रचंड वेगाने पसरत होते. यावेळी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलालाही घटनेची माहिती देऊन पाचारण करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने विनाविलंब घटनास्थळी धाव घेतली.
एकूण पाच अग्निशमन दलाची वाहने व पंधरा ते वीस मोठे पाण्याचे टँकर या ठिकाणी दाखल झाले. तातडीने आग विझवण्याचे काम सुरू करण्यात आले. कंपनी जवळपास एक एकरावर असल्याने आग सकाळच्या सात वाजेपासून ते दहा वाजेपर्यंत आटोक्यात आली नव्हती. कंपनीत प्लास्टिकचा कच्चा माल आणि तयार माल मोठ्या प्रमाणावर असल्याने आग वेगाने पसरत असल्याने परिस्थिती काही काळ गंभीर बनली होती.
या आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये यंत्रसामग्री, कच्चा माल आणि तयार उत्पादनाचे नुकसान झाले असून, नुकसानीचा नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही.
शॉर्टसर्किटमुळेच आग लागली का, याबाबत प्रशासन तपास करत आहे. सकाळच्या वेळेमुळे आणि कामगारांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
पाण्याच्या फवाऱ्यांसह विविध यंत्रसामग्रीचा वापर
घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाची वाहने तातडीने दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्यांसह विविध यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. या कारवाईवेळी करमाड पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.