Shendra Bidkin Greenfield Highway pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Shendra Bidkin Greenfield Highway : ग्रीनफिल्ड महामार्गाची जमीन मोजणी १० दिवसांत होणार पूर्ण !

अधिकाऱ्यांच्या संवादानंतर शेतकऱ्यांचा विरोध मावळला

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शेंद्रा-बिडकीन ऑरिक आणि दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) मधील उद्योगांना दळणवळणाच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्तावित असलेल्या 'शेंद्रा-बिडकीन ते ढोरेगाव' या इंडस्ट्रियल ग्रीनफिल्ड महामार्गाच्या कामाला शासनाने फास्टट्रॅकवर घेतले आहे.

या प्रकल्पासाठी प्रशासकीय अधिसूचना जाहीर होताच भूसंपादनापूर्वीची जमीन मोजणी प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्यात आली असून, येत्या दहा दिवसांत ही मोजणी पूर्ण केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे यांनी दिली आहे.

शहरातील औद्योगिक वसाहतींचा विस्तार वेगाने होत असून, शेंद्रा आणि बिडकीन या दोन प्रमुख औद्योगिक केंद्रांना जोडणाऱ्या आणि पुढे ढोरेगावपर्यंत जाणाऱ्या या नव्या ग्रीनफिल्ड महामार्गामुळे उद्योगांच्या मालवाहतुकीला मोठी गती मिळणार आहे. या महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या संपादनाची प्राथमिक पायरी म्हणून सध्या बिडकीन आणि संभाजीनगर तालुक्यातील बाधित होणाऱ्या जमिनींची मोजणी अत्यंत जलद गतीने सुरू करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांची समजूत काढण्यात प्रशासनाला यश

जमीन मोजणीसाठी महसूल आणि भूमी अभिलेख विभागाची पथके बांधावर पोहोचल्यानंतर काही ठिकाणी सुरुवातीला स्थानिक शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध दर्शवला होता. मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांना भूसंपादनाची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया, मिळणारा मोबदला आणि प्रकल्पाचे महत्त्व समजावून सांगितले. प्रशासनाकडून योग्य माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांचा गैरसमज दूर होऊन विरोध मावळला आहे. त्यामुळे आता मोजणीच्या कामात कोणताही अडथळा नसून प्रक्रियेने वेग घेतला असल्याचे उपजिल्हाधिकारी बंगाळे यांनी स्पष्ट केले.

पुढील प्रक्रिया लवकरच सुरू होणार

सध्या सुरू असलेली जमीन मोजणीची प्रक्रिया पुढील दहा दिवसांत १०० टक्के पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. ही मोजणी पूर्ण झाल्यानंतर बाधित क्षेत्राचा अंतिम अहवाल तयार करून प्रत्यक्ष भूसंपादन आणि मोबदला वाटपाची पुढील कायदेशीर प्रक्रिया तातडीने सुरू केली जाणार असल्याचे संकेतही महसूल विभागाने दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT