Sambhajinagar news : निदा खानला आश्रय; एमआयएम नगरसेवकाच्या घरावर बुलडोझर file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar news : निदा खानला आश्रय; एमआयएम नगरसेवकाच्या घरावर बुलडोझर

नाशिक धर्मांतर प्रकरण : अधिकृत मालमत्तेवर मनपाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Shelter for Nida Khan; Bulldozer at MIM Corporator's House

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानचा आश्रयदाता एमआयएम नगरसेवक मतीन शेखच्या अनधिकृत दोन मजली घरासह कार्यालय व इतर अशा तीन मालमत्ता महापालिकेने बुधवारी (दि. १३) सकाळी ७ वाजता बुलडोझर चालवीत जमीनदोस्त केल्या. एखाद्या नगरसेवकाच्या अनधिकृत मालमत्तेवर बुलडोझर चालविण्याची ही पहिलीच वेळ आहे.

नाशिक येथील धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्यामुळे एमआयएम नगरसेवक मतीन शेख मागील आठवडाभरापासून चर्चेत आहे. आरोपीला लपवून ठेवल्याप्रकरणात पोलिसांनी शेख मतीन विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईनंतर महापालिका प्रशासानेही मतीनच्या मालमत्तांचा शोध घेऊन त्याचा पंचनामा करण्यास सुरुवात केली. यात मतीनने ज्या घरात निदा खानला लपवून ठेवले होते.

त्या घरासह इतर तिन्ही मालमत्ता या बेकायदेशीर असल्याचे तसेच त्याचे गुंठेवारीदेखील केली नसल्याने प्रशासनाला चौकशीतून आढळले. त्यामुळे मनपाने या बेकायदेशीर बांधकामांना नोटीस बजावून मालकी हक्काची कागदपत्रे सादर करण्याची सूचना केली होती. मात्र, मतीनने महापालिकेने बजावलेल्या तीन दिवस मुदतीच्या नोटीसला खंडपीठात आव्हान दिले होते. त्यात नोटीसला स्थगिती देण्याची विनंती त्यांनी केली होती. परंतु, न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दर्शविला.

दरम्यान, मंगळवारी न्यायालयाच्या निर्णयानंतर महापालिका अतिक्रमण हटाव विभागाने मतीनच्या त्या तिन्ही मालमत्तांना २४ तास मुदतीची नोटीस बजावली. यात स्वतःहून बांधकाम काढून घेण्याची सूचना केली होती. महापालिका बुधवारी सकाळीच कारवाई करणार असून त्याची तयारी प्रशासन करीत आहे, याबाबत एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांना कुणकुण लागली होती.

त्यामुळे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यासह ३३ नगरसेवक मंगळवारी रात्री नारेगावातील मतीनच्या घरी जमा झाले. पहाटेपर्यंत हा जमाव मतीन शेखच्या घर, कार्यालय परिसरात तळ ठोकून होता. याबाबत महापालिका आणि पोलिस पथकाला माहिती मिळूनही अतिक्रमण विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव बुधवारी सकाळीच पथकासह नारेगावात दाखल झाले. सकाळी ७ वाजेपासून कारवाईला सुरुवात केली. यात पहिल्यांदा घर, कार्यालय, दुकानांवर जेसीबी चालविला. त्यानंतर निदा खान ज्या घरात वास्तव्यास होती. ते घर जमीनदोस्त करण्यात आले.

मतीनच्या मालमत्ता

मतीन शेखचे नारेगावच्या मुख्य रस्त्यावर २४०० चौरस फुटांचे घर होते. त्याखाली सहा दुकाने, दहा खोल्या होत्या. त्यालगत ३० बाय २० च्या जागेत कार्यालय थाटले होते. कौसर पार्क येथे २० बाय ३० च्या भूखंडावर दोन मजली घर होते. याच ठिकाणी आरोपी निदा खान हिला आश्रय देण्यात आला होता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT