छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन भाच्याला वारंवार घरातून हाकलून लावण्याची धमकी देत त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणात आरोपी मामीने सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एस. मोमीन यांनी फेटाळून लावला.
प्रकरणात १९ वर्षीय पीडित युवकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, आईच्या मृत्यूनंतर शिक्षणासाठी तो मामाच्या घरी राहत होता. याच काळात त्याच्या मामीने घरात कोणी नसताना अश्लील वर्तन सुरू केले. शरीरसुखाची मागणी करणे तसेच नकार दिल्यास बदनामी व खोट्या गुन्ह्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले.
मार्च २०२३ मध्ये आरोपी मामीने पीडित युवकाला बेडरूममध्ये बोलावून इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर वारंवार असे अत्याचार करण्यात आले. याबाबत मामीने, कोणालाही सांगितल्यास तुझ्यावर व तुझ्या वडिलांवर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करीन, अशी धमकी दिल्याने पीडित युवक घाबरला होता.
सप्टेंबर २०२३ मध्ये युवकाच्या मामाने मामी व पीडित युवकाला रंगेहाथ पकडल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर युवक वडिलांकडे राहायला गेला. पुढे मामी जुलै २०२४ मध्ये दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेल्याची माहिती समोर आली असून, याबाबत मिसिंगची नोंदही करण्यात आली होती. प्रकरणात चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.तसेच गुन्ह्यात २० नोव्हेंबर २०२५ रोजी दोषारोपपत्रही सादर करण्यात आले.
आरोपी मामीला हायकोटनि अटी व शर्तीवर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. मात्र तिने अटींचे उल्लंघन करत ती तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहिली नाही. त्यामुळे हायकोर्टातील जामीन अर्ज मागे घेत, तिने अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. अर्जाच्या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता ज्ञानेश्वरी नागुलोली यांनी आरोपीकडून साक्षीदारांना धमकावणे, पीडितावर दबाव आणणे, पुरावे नष्ट करणे तसेच कायद्याबाबत भीती न बाळगता पुन्हा गुन्हे करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी मामीचा जामीन अर्ज फेटाळला.