Sillod Rain : सिल्लोडमध्ये सात गावांचा संपर्क तुटला  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sillod Rain : सिल्लोडमध्ये सात गावांचा संपर्क तुटला

सिल्लोड : तालुक्यात अतिवृष्टी म्हसल्यात पाणी शिरले पिके पाण्यात

पुढारी वृत्तसेवा

Seven villages lost contact in Sillod

राजू वैष्णव

सिल्लोड : शनिवारी रात्री तालुक्यात तिसऱ्यांदा अतिवृष्टी झाली. यात अंभई, निल्लोड, बोरगाव बाजार, भरडी, आमठाणा मंडळात अतिवृष्टी झाली, तर उर्वरित सिल्लोड, गोळेगाव, अजिंठा मंडळ पावसाने झोडपून काढले. रात्रभर झालेल्या या पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. सात गावांचा संपर्क तुटला असून म्हसला बु. गावात अंजना नदीचे पाणी शिरले. आधीच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हताश झालेला असताना पुन्हा पावसाने तडाखा दिल्याने होत्याचे नव्हते झाले आहे.

शनिवारी रात्री पावसाने हाहाकार केला. रात्र जागून काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. तालुक्यात सरासरी ८० मि. मी. झालेल्या या पावसामुळे पूर्णा, अंजना, खेळणा, जुई, भोरडी, चारणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. अंजना नदीचे पाणी म्हसला बु. गावात शिरले. यात शाळा, पशुवैद्यकीय दवाखान्यात पाणी शिरल्याने नुकसान झाले. तर बोरगाव सारवणी, बोरगाववाडी, आमठाणा, केळगाव, नानेगाव, जंजाळा, उपळी या गावांचा संपर्क तुटला. घाटनांद्रा गावाचा संपर्कही तुटला होता. सकाळी पूर ओ सरल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरु झाली.

शनिवारी रात्री अंभई मंडळात तब्बल १४५, तर निल्लोड मंडळात ११५ मि. मी. पाऊस झाला. सिल्लोड मंडळात ४८, भराडी ८४, अजिंठा ५२, गोळेगाव ५०, बोरगाव बाजार ७८ तर आमठाणा मंडळात ६९ मि. मी. पाऊस झाला. या आठवडाभरात तालुक्यातील सर्वच मंडळात अतिवृष्टी झाली. यात आमठाणा मंडळात तिसऱ्यांदा तर अंभई, मंडळात दुसऱ्यांदा अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झाला आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या नुकसानीची प्रशासनाने पाहणी करीत पंचनामे सुरु केले होते. मात्र त्यानंतर पुन्हा अतिवृष्टी व सतत पाऊस सुरु असल्याने सर्वच मंडळातील शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे सरसगट पंचनामे करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. तालुक्यात अतिवृष्टी होत असल्याने महसूल, पोलिस प्रशासन अलर्टवर आहे. रविवारी सकाळी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार सतीश सोनी, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांनी तालुक्यात फिरुन नुकसानीची पाहणी केली व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

आठवडाभरापूर्वी झालेल्या नुकसानीचे पंचनामे जवळपास ८० टक्के पूर्ण झालेले आहे. त्यात सतत पाऊस पडत राहिला. तर शनिवारी रात्री पुन्हा तालुक्यात अतिवृष्टी झाली. यामुळे शेती नुकसानीत भर पडली आहे. यामुळे पुन्हा पाहणी करुन पंचनामे करण्यात येतील. यात नुकसानग्रस्त एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल.
लतीफ पठाण, उपविभागीय अधिकारी.

निल्लोड तलावाचा सांडवा केला मोकळा

निल्लोड लघुसिंचन तलाव या वर्षी सर्वात आधी ओव्हरफ्लो झाला. शनिवारी रात्री या मंडळात तब्बल ११५ मि. मी. पाऊस झाल्याने तलावाने धोक्याची पातळी ओलांडली होती. यामुळे धोका निर्माण झाला होता. मात्र भाजपचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मोठे, सरपंच उत्तम शिंदे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने व जेसीबीच्या साह्याने सांडवा मोकळा केला. यामुळे अनर्थ टळला. तर याची माहिती मिळताच मंडळ अधिकारी गजेंद्र चांदे, तलाठी सुरडकर साहेब, ग्रामसेवक के. पी. पवार साहेब, सिंचन विभागाच्या साक्षी राठोड, धनश्री बागुल यांनी धाव घेत पाहणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT