Set up watering points for livestock in villages across the district
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हात ग्रामीण भागातील पशुधनासाठी गावपातळीवर पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी हौद व पाणवठे तयार करावेत, तसेच चारा टंचाईवर मात करण्यासाठी हायड्रोपोनिक चारा उत्पादनाचा प्रचार व प्रसार वेगाने करावा, असे स्पष्ट आदेश जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती जितेंद्र जैस्वाल यांनी दिले.
जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या दालनात पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीची मासिक आढावा सभा नुकतीच पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा व कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पशुपालकांना दिलासा देण्यासाठी उपाध्यक्षांनी महत्त्वाच्या सूचना केल्या.
यामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या पशुधन विमा योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी गावपातळीवर विशेष जनजागृती शिबिरे आयोजित करावीत, जनावरांसाठी मुबलक पाण्याचे नियोजन म्हणून पाणवठे उभारावेत आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हायड्रोपोनिक चारा पद्धती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, यावर भर देण्यात आला.
या बैठकीस समितीचे सदस्य पांडुरंग औटे, लंकाबाई जाधव, राधाकृष्ण काकडे, अनिता बनकर, वंदना शिंदे, स्वाती पाटेकर, पदसिद्ध सचिव नानासाहेब कदम यांच्यासह पशुसंवर्धन विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी व उपस्थित होते. कर्मचारी आदी उपस्थित होते.