Wastage of water : जलवाहिनीचा व्हॉल्व्ह निखळला, टीव्ही सेंटर चौकात पाणीच पाणी

पाणीटंचाईच्या काळात हजारो लिटर पाण्याची नासाडी : वाहतुकीला अडथळा, नागरिकांची नाराजी
Wastage of water
Wastage of water : जलवाहिनीचा व्हॉल्व्ह निखळला, टीव्ही सेंटर चौकात पाणीच पाणीfile photo
Published on: 
Updated on: 

Water pipeline valve comes off; TV Center Square flooded with water

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात पाणीटंचाईची तीव्रता कायम असतानाच टीव्ही सेंटर चौकात नव्या जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह निखळल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेल्याचा प्रकार गुरुवारी (दि.२२) सायंकाळी सातच्या सुमारास टीव्ही सेंटर चौकात घडला. सुमारे अर्धा तास पाण्याचे लोट रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. एकीकडे नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. तर दुसरीकडे जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी वाहून जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घटनास्थळी धाव घेत व्हॉल्व्हच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले.

Wastage of water
Crime News : दुहेरी हत्याकांडातील आरोपींच्या बॅगेत गावठी कट्टा, तीन काडतुसे !

सिडको-हडको परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन योजनेअंतर्गत १,५०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. टीव्ही सेंटर येथील जलकुंभाला या जलवाहिनीतून पाणी दिले जाते. त्यासाठी मुख्य पाइपलाइनवर नवीन व्हॉल्व्ह बसविण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी याच यंत्रणेशी संबंधित ४०० मिमी व्यासाच्या पाइपलाइनला गळती लागली होती.

या गळतीदरम्यान व्हॉल्व्हला धक्का बसल्याचे बोलले जात असून गुरुवारी सायंकाळी हा व्हॉल्व्ह निखळल्याने जलवाहिनीतील पाणी वेगाने रस्त्यावर वाहत होते. दरम्यान, सायंकाळच्या वेळी चौकातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असताना रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांची गैरसोय झाली. मुख्य जलवाहिनीतून पाणी वाया जात असल्याचे पाहून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. या घटनेची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गायकवाड, उपअभियंता आशिष वाणी, चौधरी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

निखळलेल्या व्हॉल्व्हची दुरुस्ती करून त्याचे नट-बोल्ट पुन्हा बसविण्यात आले. व्हॉल्व्ह योग्यरीत्या बसविण्यासाठी पाइपलाइनचे स्कोअरिंग करण्याच्या प्रक्रियेत पाणी सोडण्यात आल्याचे मनपा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

Wastage of water
Sambhajinagar News : चिकलठाण्यात ड्रेनेजच्या पाण्यावर पालेभाज्यांची शेती

एकीकडे पाण्यासाठी भटकंती, दुसरीकडे नासाडी

शहरात अनेक भागांतील नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. तर दुरुस्तीच्या कामादरम्यान अशा प्रकारे हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून पाणी बचतीसह गळती रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, जलवाहिन्या आणि व्हॉल्व्हच्या दुरुस्तीवेळी पाणी वाहून जाण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने पाणी बचतीच्या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news