Senior Thackeray Sena leaders turn their backs on Zilla Parishad election campaign
सुनील कच्छवे
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे सेनेच्या नेत्यांनी जिल्हाभरात ठिकठिकाणी सभा घेत प्रचाराचा धुरळा उडविला. तर दुसरीकडे ठाकरे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र या निवडणुकीच्या प्रचाराकडे पाठ फिरविली. नितीन बानगुडे वगळता बाहेरून पक्षाचा एकही नेता इथे आला नाही. आदित्य ठाकरे यांची नियोजित सभाही ऐनवेळी रद्द झाली. त्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी पसरली आहे.
शिवसेना उबाठा पक्ष जिल्हा परिषदेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवित आहे. महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीलाही सोबत घेतले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ६३ गटांपैकी ३६ गटांत ठाकरे सेनेने आपले उमेदवार उतरविले आहेत.
कॉंग्रेसने १६ आणि वंचित बहुजन आघाडीने ६ ठिकाणी उमेदवार दिले आहेत. तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे सेनेने युतीची घोषणा केली असली तरी अनेक तालुक्यात प्रत्यक्षात ही युती तुटली आहे. या बहुरंगी लढतीत भाजपकडून आतापर्यंत मंत्री चंद्रशेखर बावन्नकुळे, मंत्री पंकजा मुंडे आदी नेत्यांनी गावोगावी सभा घेतल्या.
त्याच पद्धतीने शिंदे सेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत यांनीही प्रचार केला. परंतु ठाकरे सेनेकडून मात्र नितीन बानगुडे वगळता जिल्ह्यात बाहेरचा एकही नेता प्रचारासाठी फिरकला नाही. आदित्य ठाकरे यांची नियोजित सभाही ऐन-वेळी रद्द झाली. स्थानिक पातळीवर अंबादास दानवे यांनी एकट्याने प्रचाराची धुरा सांभाळली. त्यामुळे पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये किंचित नार-ाजी व्यक्त होत आहे.
उद्धव ठाकरेंच्या तीन सभा आणि तीन अपयश
कधीकाळी छत्रपती संभाजीनगर जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. मात्र, सेनेतील विभाजनानंतर परिस्थिती बदलली आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदे सेना आणि ठाकरे सेना इथे एकमेकांच्या विर-ोधात होत्या. उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यासाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा घेतली.
मात्र, या निवडणुकीत खैरे यांचा पराभव झाला. नंतर विधानसभा निवडणुकीतही उद्धव ठाकरे यांनी सांस्कृतिक मंडळावर सभा घेतली. त्यातही पक्षाला जिल्ह्यातील नऊपैकी एकही जागा मिळविता आली नाही. आता महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा सांस्कृतिक मंडळावर सभा घेतली. त्यात त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवाची खंत बोलून दाखविली. मात्र, मनपा निवडणुकीतही ठाकरेंच्या पक्षाला ११५ पैकी केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले.