Searches at drug peddlers' homes, checking of mobile CDRs begins
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : औषधांच्या नावाखाली सुरू असलेल्या नशेच्या काळाबाजाराचा पोलिस आयुक्तांचे विशेष पथक, गुन्हे शाखा व नार्कोटिक्स पथकाने पर्दाफाश केला. वाळूज येथे ट्रान्सपोर्टमार्फत आलेले अडीच हजार कोडेनयुक्त सिरपचे पार्सल जप्त करून १३ जणांना अटक केली. ४१ पेडलर्सवर गुन्हा दाखल झाला. कारवाईत एवढे आरोपी होण्याची ही पहिलीच वेळ असून, सर्वांच्या घरांच्या झडत्या घेतल्या जात आहेत. तसेच यांचे मोबाईल नंबरचे रेकॉर्ड तपासणी सुरू आहे.
मुख्य सूत्रधार रूपेश रामकृष्ण पाटील (२९), अविनाश रामकृष्ण पाटील (३४, दोघे रा. शिरसगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव), अमोल दत्तात्रय येवले (३०, धामोडे, येवला, नाशिक) यांच्यासह पेडलर अरशद इब्राहिम पठाण (२६, रा. बायजीपुरा), समीर शेख युनिस शेख (२३, रा. मोतीकारंजा), अब्दुल अजिम कदीर शहा (३०, रा. शहानुरवाडी), मोसीन अमिन तांबोळी (२५, बायजीपुरा), सय्यद समीर सय्यद शौकत ऊर्फ स्टायलो (२७, बायजीपुरा), सोहेल हानिफ शाह (२४, बायजीपुरा), सोहेल सलीम ईलाबी (२०, नवाबपुरा, मोंढा रोड), रिजवान खान रशीद खान (२५, रेंगटीपुरा), सय्यद अल्ताफ जफर (२२, बायजीपुरा), जावेद खान (४३, रा. बीड) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
या टोळीचे सूत्रधार अविनाश व रूपेश पाटील हे असून, रूपेशचा साथीदार अमोल येवले याच्या बंद पडलेल्या मेडिकल व रद्द झालेल्या जीएसटी नंबरचा वापर करून औषधीचा साठा मागविला. बनावट कागदपत्रे तयार करून येवले मेडिकल अँड जनरल स्टोअर्स नावाचे दुकान दाखवून कोडेनयुक्त औषधांचा मोठा साठा ते छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात विक्री करत होते.