Scrapping yard at ST's Kagzipura site
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कागजीपुरा येथे एसटी महामंडळाची सुमारे ११० एकर जागा आहे. ही जागा प्रशिक्षण केंद्रासाठी ठेवण्यात आली होती. दरम्यान, या जागेवर आता स्क्रॅपिंग यार्ड बनवण्याचे नियोजन आहे. या जागेची पाहणी आरटीओकडून केली असून, याचे नियोजन एसटीच्या वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
एसटी महामंडळाची कागजीपुरा दौलताबाद येथे सुमारे ११० एकर जमीन आहे. या जमिनीवर एसटी कर्मचाऱ्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी येथे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार होते. काही तांत्रिक कारणामुळे या प्रशिक्षण केंद्राला मुहूर्त लागलाच नाही. या मोकळ्या जागेचा वापर करण्यासाठी परिवहन विभागाने वरिष्ठ पातळीवर स्क्रॅपिंग यार्ड बनवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर परिवहन विभागाने आरटीओ कार्यालयांला पत्र पाठवून जागेची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
प्राथमिक अहवाल पाठवला काही दिवसांपूर्वीच परिवहन विभागाच्या सूचनेनुसार कागजीपुरा येथील मोकळ्या जागेची पाहणी स्कॅपिंग यार्डासाठी योग्य आहे की नाही याची पाहणी आरटीओच्या पथकाने करून याचा प्राथमिक अहवाल परिवहन विभागाला सुपूर्द केला आहे. या अहवालावर पुढील कार्यवाहीचे नियोजन वरिष्ठ पातळीवर सुरू आहे.विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी
वरिष्ठांनी पाहणी केली परिवहन विभागाने एसटीच्या मोकळ्या जागेत स्क्रॅपिंग यार्ड बनवण्याचे नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या जागेवर भेट देऊन जागेची पाहणी केली आहे. आता याचे नियोजन वरिष्ठ पातळीवर आहे. एसटीच्या विविध ठिकाणी मोकळ्या असलेल्या जागांवर बसस्थानकासह विविध उपक्रम राबवण्याचे नियोजन वरिष्ठ पातळीवर करण्यात येत आहे.सचिन क्षीरसागर, तत्कालीन विभाग नियंत्रक