Save Nature, Save Vulture awareness message for vulture conservation
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या गिधाडांच्या संवर्धनासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने खामगाव येथील श्री गोरक्ष आयुर्वेद महाविद्यालयात दुर्मिळ औषधी वृक्षांचे रोपण करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सह-कार्यवाह (गतिविधी, पर्यावरण), वन्यजीव व वृक्षसंवर्धक डॉ. संतोष पाटील यांच्या पुढाकाराने सेव्ह नेचर, सेव्ह व्हल्चर हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी डॉ. पाटील यांनी सांगितले, की पाळीव प्राण्यांवरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या डायक्लोफिनॅक असेक्लोफिनॅक व नेप्रोक्सेन यांसारख्या औषधांमुळे गिधाडांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. या औषधांना सुरक्षित पर्याय म्हणून सलई वृक्षातील बॉसवेलीन घटकांपासून निर्माण होणाऱ्या औषधांवर विशेष संशोधनाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
संवर्धनाच्या उद्देशाने महाविद्यालयाच्या परिसरात सलई, बिजा, मोह, शांभवी आदी औषधी गुणधर्म असलेल्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मोहन सोनवणे, प्राचार्य डॉ. शुभदा लोणीकर, द्रव्यगुण विभागप्रमुख डॉ. प्रिया वडते, सहायक प्राध्यापक डॉ. श्रद्धा जनसे व विद्यार्थी उपस्थित होते.
निसर्गाचे स्वच्छतारक्षक
गिधाडे मृत प्राण्यांचे मांस खाऊन निसर्गाची स्वच्छता राखतात. त्यांची संख्या कमी झाल्याने मृत प्राण्यांचे अवशेष सडून रोगराई पसरण्याचा धोका वाढतो. तसेच मृत प्राणी खाणाऱ्या भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने रेबीजसारख्या आजारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे गिधाडांचे संवर्धन हे केवळ एका पक्ष्याचे रक्षण नसून मानवी आरोग्याच्या सुरक्षेशी संबंधित असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.