pistol racket : सत्यम चाटेच पिस्तूल रॅकेटचा मुख्य 'सप्लायर'; आणखी ३ पिस्तूल जप्त file photo
छत्रपती संभाजीनगर

pistol racket : सत्यम चाटेच पिस्तूल रॅकेटचा मुख्य 'सप्लायर'; आणखी ३ पिस्तूल जप्त

सिडको पोलिसांकडून दोघांना अटक; आतापर्यंत ७ पिस्तूल, २० राऊंड जप्त; आरोपींची संख्या ८ वर

पुढारी वृत्तसेवा

Satyam Chate is the main 'supplier' in the pistol racket; 3 more pistols seized

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : उच्चशिक्षित तरुणांच्या टोळीकडून सिडको पोलिसांनी एकाच रात्रीत नेटवर्क उद्धवस्त करत ६ जणांकडून ४ काडतुसे जप्त केली होती. तपासात या संपूर्ण रॅकेटमध्ये बी. कॉम. चा विद्यार्थी असलेला आरोपी सत्यम चाटे हाच शहरातला मुख्य पिस्तूल विक्रेता असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने दोन व्यवसायिकाला विक्री केलेले आणखी ३ पिस्तूल आणि ९ जिवंत काडतुसे सिडको पोलिसांनी जप्त करून दोघांनाही अटक केली.

शुभम वाळके कृष्णा अधाने शुभम धर्मराज वाळके (२६, रा. सावित्रीनगर, हिमायत बाग) आणि कृष्णा विष्णू अधाने (२९, रा. गोळेगाव, ता. खुलताबाद) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी रविवारी (दि. २५) दिली. या कारवाईत आतापर्यंत ७ पिस्तूल आणि २० काडतुसे जप्त करण्यात आली असून आरोपींची संख्या ८ झाली आहे.

सिडको ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने छापा टाकून सुरुवातीला शिवा सुरे (२५, रा. सुरेवाडी, शिक्षण बी.एस्सी. पदवीधर), सुमीत विसपुते (२५, रा. सुरेवाडी, शिक्षण बी.एस्सी. बायोइन्फॉर्मेटिक्स), सत्यम चाटे (२३, रा. मयूरपार्क, शिक्षण बी. कॉम. तृतीय वर्षाचा विद्यार्थी), अर्जुन लिंगायत (२०, रा. नवजीवन कॉलनी, शिक्षण बीसीएस तृतीय वर्षाचा विद्यार्थी), श्रीकांत शिखरे (२४, रा. मयूरपार्क, शिक्षण बीसीएस) आणि विशाल भोसले (२४, रा. जाधववाडी, १२ वी पास) या टोळीला अटक करून ४ पिस्तूल ९ काडतुसे जप्त केली होती. दरम्यान, सत्यम चाटे आणि अर्जुन लिंगायत यांच्याकडून सुरुवातीला देशी पिस्तूल जप्त केले होते.

या दोघांची वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल येरमे व उपनिरीक्षक अनिल नाणेकर यांनी कसून चौकशी सुरू केली. त्यावेळी सत्यम चाटे हा केवळ स्वतःपुरते पिस्तूल बाळगत नसून, मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर मध्यस्थामार्फत शस्त्रे आणून शहरात त्यांची कमिशनवर विक्री करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्यमने सुमारे दीड महिन्यापूर्वी हिमायत बाग परिसरातील सावित्रीनगर येथे राहणारा मिनरल वॉटर बॉटल उत्पादक शुभम वाळके याच्याशी संपर्क साधला होता. सत्यमने ५० हजार रुपयाला एक याप्रमाणे दीड लाख रुपयांत शुभमला एकाच वेळी तीन देशी पिस्तूल आणून दिले होते.

सत्यमकडून ३ पिस्तूल खरेदी केल्यानंतर शुभम वाळके याने स्वतः गुन्हेगारी जगतातील सब-डीलरसारखे काम सुरू केले. त्याने या तीन पिस्तुलांपैकी २ पिस्तूल स्वतःच्या सावित्रीनगर येथील अड्ड्यावर लपवून ठेवले. तर उर्वरित एक पिस्तूल त्याने खुलताबादच्या गोळेगाव येथे कपड्याचे दुकान चालवणारा व्यावसायिक कृष्णा अधाने याला थेट ६० हजार रुपयांमध्ये विकले. शुभमने अवघ्या काही दिवसांत १० हजार रुपयांचा निव्वळ नफा खिशात घातला.

आणखी कोणाकोणाला विकली शस्त्रे ? पोलिसांचा तपास सुरू

सत्यम चाटे याने शहरात अथवा ग्रामीण भागात आणखी किती जणांना अशा प्रकारे पिस्तूल आणि काडतुसांची विक्री केली आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिस त्याच्या बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार, कॉल डिटेल्स आणि व्हॉट्सअॅप चॅट्सची फॉरेन्सिक तपासणी करत आहेत. या सिंडिकेटमध्ये आणखी काही उच्चशिक्षित तरुण व व्यापारी अडकण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

व्यावसायिकांना कशासाठी हवे होते पिस्तूल ?

या संपूर्ण कारवाईत एकापाठोपाठ एक ७ देशी पिस्तूल आणि २० जिवंत काडतुसे जप्त झाल्याने पोलिस प्रशासनही चक्रावून गेले आहे. मिनरल वॉटर बॉटल निर्मितीचा कारखाना चालवणारा शुभम वाळके आणि कपड्याचे दुकान चालवणारा कृष्णा अधाने या दोघांचाही आर्थिक स्तर चांगला असताना, त्यांनी ही घातक शस्त्रे स्वतःकडे कशासाठी खरेदी करून ठेवली होती? केवळ समाजात दहशत माजवण्यासाठी, स्टेटस सिम्बॉल म्हणून की एखाद्या मोठ्या आर्थिक वादातून प्रतिस्पर्ध्याचा काटा काढण्यासाठी ही शस्त्रे जमवली जात होती? या दिशेने सिडको पोलिस तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT