छत्रपती संभाजीनगर : येथील सातारा परिसरात अस्तित्वात नसलेली व आधीच विक्री झालेली जमीन शिल्लक असल्याचे भासवून बीड येथील एका व्यावसायिकाला विक्री करून आठ जणांनी २ कोटी ८९ लाख ८९ हजार ४२० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार १८ एप्रिल २०२४ रोजी सातारा भागातील गट क्र. २० येथे घडला.
मंजिरी अलोक चौधरी, स्वप्ना विद्याधर बडीगणवार, मोहिनी दिलवागसिंग, जावेदखॉ नुरखॉ पठाण, मैत्रेय प्लॉटिंग सेंटरचे भागीदार सुरेश सीताराम इंगळे, बद्रीनारायण नागोराव करे, साहेबराव कचरू घुगे आणि बाबूराव आनंदराव ताठे अशी आरोपींची नावे असून, त्यांच्याविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात सोमवारी (दि. १५) गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी अशोक चांदमल लोढा (६१) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे भागीदार सय्यद नजीर हे २०२३ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे जमिनीच्या शोधात होते. एजंट शेख रईस याच्या माध्यमातून त्यांची ओळख जमीन मालक आणि मैत्रेय प्लॉटिंग सेंटरच्या भागीदारांशी झाली. सातारा परिसरातील गट नंबर २० मधील १०३.५५ आर (सुमारे अडीच एकर) जमीन २ कोटी ४० लाख रुपये प्रति एकर या दराने खरेदी करण्याचे ठरले. आरोपींनी संगनमत करून तक्रारदारांकडून सुरुवातीला इसारपावती, मोजणी आणि इतर कारणांसाठी ७८ लाख रुपये उकळले.
१८ एप्रिल २०२४ रोजी या जमिनीचे तीन वेगवेगळे नोंदणीकृत खरेदीखत करून देण्यात आले. यासाठी लोढा यांच्याकडून १ कोटी ६१ लाख रुपयांहून अधिक रक्कम धनादेशाद्वारे घेतली. खरेदीखत झाल्यानंतर लोढा यांनी जमिनीची १५ लाख खर्चुन साफसफाई, तारफेन्सिंग, सपाटीकरण केले. चौकशी केली असता, ती जमीन आधीच प्लॉटिंग करून अगोदरच विकली गेली असल्याचे आणि केवळ रस्त्यासाठी सोडलेल्या पोकळीस्त क्षेत्राचा वापर करून ७/१२ वर नाव लावून फसवणूक केल्याचे समोर आले.