सरपंचाच्या मुलाचा राजकीय वादातून खून झाला. Pudhari File Photo
छत्रपती संभाजीनगर

करजंखेडामध्ये राजकीय वाद ठरला कर्दनकाळ; सरपंचाच्या मुलाचा निर्घृण खून

पुढारी वृत्तसेवा

पिशोर : गावातील राजकीय वाद एकाचा कर्दनकाळ ठरल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरात घडली आहे. येथील करंजखेडा येथे महिला संरपचाच्या मुलाचा गुरूवारी (दि.१) राजकीय वादातून धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला. निलेश कैलास सोनवणे (वय ३३) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, खून झालेल्या तरुणाची आई संगीताबाई सोनवणे या राखीव प्रवर्गातून करंजखेडा (ता.कन्नड) या गावच्या सरपंच आहेत. विरोधक पॅनलची महिला गावची सरपंच झाल्याचा राग दुसऱ्या गटाच्या डोक्यात होता. याच वादामुळे गावातील दोन गटात यात्रेदरम्यान २०२२ मध्ये मानाचा नारळ फोडण्यावरून वाद झाला होता. त्यावेळी अट्रॉसिटीचा गुन्हा काही राजकीय मंडळींवर दाखल करण्यात आला होता. त्यानंतरसुद्धा या दोन्ही गटात विविध कारणाने अधूनमधून वाद होत होता. अशी चर्चा गावभर सुरू आहे.

गुरूवारी सकाळी नेहमीप्रमाणे गुरांना चारापाणी करण्यासाठी गेलेला निलेश बराच वेळ घरी न आल्याने सरपंच संगीताबाई, त्यांचे पती त्याला बघायला शेतात गेले. रस्त्याने त्यांना आरोपी मयूर सोळुंके, विजय वाघ, यांच्यासह चार जण गावाकडे जाताना दिसले. पुढे शेतात पोहचल्यानंतर निलेशची दुचाकी बांधाच्या कडेला पडलेली आढळून आली. पुढे जाऊन बघितले असता मक्याच्या शेतात निलेश हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी आरडाओरडा केली असता आजूबाजूचे शेतकरी जमा झाले. त्यानंतर निलेशला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापुर्वीच त्याला तपासून मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पिशोर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे, पोलिस उपनिरीक्षक रतन डोईफोडे, बिट जमादार लालचंद नागलोत, संजय लगड, परमेश्वर दराडे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. सरपंच संगीताबाई सोनवणे यांच्या तक्रारीवरून मयूर सोळुंके, विजय वाघ यांच्यासह चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात असून उपविभागीय अधिकारी विजय ठाकूरवाड हे अधिक तपास करत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT