Saptakund waterfall in Ajanta Caves overflows due to heavy rains
फर्दापूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक आठवड्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आणि फर्दापूर परिसरात अखेर समाधानकारक पावसाची हजेरी लागली आहे. या पावसामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून कोरडा पडलेला सप्तकुंड धबधबा पुन्हा एकदा नवसंजीवनी घेऊन गर्जना करत कोसळू लागला आहे. धबधब्याच्या नजाऱ्याने पर्यटक मंत्रमुग्ध होत असून, या परिसरात जलप्रपाताचे भव्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
शनिवारी (दि.१६) दुपारी पडलेल्या मध्यम स्वरूपाच्या सरींनंतर रात्री व रविवारी पहाटे जोरदार मुसळधार पावसामुळे ढगफुटीजन्य स्थिती निर्माण झाली. यामुळे वाघुर नदीसह परिसरातील अनेक छोटे-मोठे नाले आणि तलाव भरून वाहू लागले आहेत.
सात टप्प्यांमधून कोसळणारा सप्तकुंड धबधबा हे अजिंठा लेणी परिसरातील प्रमुख आकर्षण आहे. निसर्गाच्या कुशीत लपलेले हे सौंदर्यस्थान सध्या जलप्रपाताच्या अप्रतिम दृश्याने अधिकच खुलून दिसत आहे. रविवारी सकाळपासूनच पर्यटकांची सतत वाढणारी गर्दी, धबधब्याच्या काठावर सेल्फी घेणारे पर्यटक, जलप्रपाताच्या गडगडाटात हरवलेले क्षण हे दृश्य खरोखरच मंत्रमुग्ध करणारे होते.
सप्तकुंड धबधबा केवळ नैसर्गिक आकर्षण नसून, तो अजिंठा लेणीच्या ऐतिहासिक वारशामध्ये एक भावनिक आणि पर्यावरणीय ठळक बाब बनला आहे. स्थानिकांसह देश-विदेशातील पर्यटक पुन्हा याकडे आकर्षित होत आहेत. धबधबा परिसरात कोणत्याही सुविधा नसल्याने पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत, निवारा व्यवस्था, स्वच्छतागृहे, कचराकुंड्या, आणि प्राथमिक वैद्यकीय सेवा यांसारख्या मूलभूत सुविधा येथे तातडीने उभाराव्यात, अशी मागणी पर्यटकांसह स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.