Santpeeth: Course duration is one year
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संतपीठ पैठण येथील संतपीठातील सर्व पदविका अभ्यासक्रम आता एका वर्षांचे असणार आहेत. येथील आठ अभ्यासक्रमांसाठी गुरुवारपासून (दि.२४) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अशी माहिती संतपीठाचे समन्वयक तथा प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते यांनी दिली.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाने संतपीठ, पैठणचे शैक्षणिक व्यवस्थापन विद्यापीठाकडे पुढील पाच वर्षांसाठी सोपवले आहे. यामुळे संतपीठात भारतीय परंपरा व संस्कृती, संतसंप्रदाय, संत साहित्य, कीर्तन, प्रवचन, तत्त्वज्ञान तसेच संबंधित विषयांवरील प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम नियमितपणे राबविण्याचा मार्ग मोकळा झाला.
संतपीठात नवीन तीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी सहा महिन्यांऐवजी नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे एका वर्षाचा करण्यात आला आहे. या मध्ये संत नामदेव गाथासह तीन नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली.
या ठिकाणी श्री तुकाराम गाथा, श्री. एकनाथी भागवत, वारकरी संप्रदाय व महानुभाव संप्रदाय परिचय व श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ परिचय हे पाच प्रमाणपत्र अभ्यासक्रम सध्या सुरु आहे. तसेच यंदापासून संत नामदेव गाथा परिचय, संत तत्वज्ञान व सांप्रदायिक संगीत हे तीन नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. या सर्व अभ्यासक्रमांना २४ सप्टेंबरपासून प्रवेश देण्यास सुरुवात करण्यात आले असल्याची माहिती डॉ वक्ते यांनी दिली.