थकीत ऊस बिल शेतकऱ्यांना मिळावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.  (छाया: चंद्रकांत अंबिलवादे)
छत्रपती संभाजीनगर

Swabhimani Shetkari Sanghatana protest : कारखान्याकडे ऊस बिल थकीत; १५ टक्के व्याजासह तात्काळ द्या

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलसमोर आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

पैठण : संत एकनाथ साखर कारखान्याची मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेतलेल्या सचिन घायाळ शुगर लिमिटेड या कंपनीने २०२५-२६ गाळप हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर ऊस घेऊन गाळप केले. मात्र संबंधित शेतकऱ्यांचे उसाचे बिल अद्याप थकीत असल्याने नाराजी तीव्र झाली आहे. या थकीत बिलावर १५ टक्के व्याजासह तात्काळ रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, या मागणीसाठी सोमवारी (दि.२१) तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

संत एकनाथ साखर कारखान्याला २०२५ २६ या चालू गाळप हंगामासाठी हजारो टन ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांची उसाची बिल तीन ते चार महिन्यापासून थकीत आहे. शेतकरी दररोज काच्या फेऱ्या मारून त्रस्त झाले आहेत. दरम्यान, कारखान्यावरील कामगारांच्या थकीत वेतन वसुलीसाठी महसूल प्रशासनाने कारखान्याचे दोन साखर गोदामे सील केली आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलाचे काय,असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असून, तहसील कार्यालयावर निवेदन देण्यात आले. पुढील आठवड्यात विभागीय साखर संचालक कार्यालयासमोर उपोषणासह तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेने दिला.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव मुळे, पवन शिसोदे, सुभाष नवथर, एकनाथ दसपुते, राजू शहा, साईनाथ कर्डिले, किशोर सदावर्ते, अनिल राऊत, विजय गिरगे, बबन गिरी, रेवनाथ दसपुते यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT