Sanjay Shirsat on Uddhav Thackeray
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंच्या जागी आदित्य ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याच्या चर्चांवर बोलताना, आदित्य हे पक्ष चालविण्यास अद्याप परिपक्व नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच उद्धव ठाकरेंचा पक्ष आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर असून तो “प्रायव्हेट लिमिटेड” स्वरूपाचा झाल्याची टीकाही त्यांनी केली.
शिरसाट म्हणाले की, १९ तारखेला आदित्य ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. हा प्रकार म्हणजे इतिहासाची पुनरावृत्तीच असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनीही अशाच पद्धतीने नेतृत्व स्वीकारले होते. आता आदित्य ठाकरे हेच पक्षाची धुरा सांभाळण्याच्या तयारीत असल्याचा संकेत मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
पक्षात अनेक ज्येष्ठ नेते असतानाही त्यांना संधी न देता सर्व निर्णय एकाच केंद्रातून घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “पक्षात एककलमी कारभार सुरू असून कुणाचेही मत विचारात घेतले जात नाही,” असे शिरसाट म्हणाले. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात मतभेद असल्याचेही त्यांनी सूचित केले. तसेच आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाला पक्षातील अनेकजण मान्यता देण्याच्या मनस्थितीत नसल्याचा दावा त्यांनी केला.
राज्यात सध्या शिवसेनेकडून घेतल्या जाणाऱ्या बैठकींमध्ये मंत्र्यांच्या कामकाजाबाबत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या साडेतीन वर्षांत सातत्याने निवडणुका पार पडल्या आणि पक्षाची कामगिरी चांगली राहिली, असे त्यांनी सांगितले.
सध्या निवडणुका नसल्याने कार्यकर्त्यांशी संवाद वाढविण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांनी आपले प्रश्न आणि नाराजी मोकळेपणाने मांडली पाहिजे. त्यांच्या मनातील खदखद बाहेर पडणे आवश्यक आहे. संवाद नसेल तर पक्षासाठी ते हितावह ठरणार नाही, असेही शिरसाट यांनी नमूद केले.