वैजापूर : तालुक्यात वाळू तस्करीवरून दोन गटांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी (२४) मध्यरात्री वीरगाव पोलीस ठाणे हद्दीतील बाभूळगाव येथील नदीपात्रात हा प्रकार घडल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नदीपात्रातून सुरू असलेल्या वाळू उपशावरून दोन गट आमनेसामने आले. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादाचे काही वेळातच हाणामारीत रूपांतर झाले. दोन्ही गटांमध्ये जोरदार मारामारी झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या गोंधळादरम्यान बंदुकीतून एक राऊंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र गोळीबार नेमका कुणाकडून करण्यात आला, तसेच यात कुणी जखमी झाले का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये दोन गटांतील वाद आणि गोंधळ दिसून येत असल्याचा दावा केला जात आहे. याबाबत वीरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप भिवसने यांच्याशी संपर्क साधला असता, “अशी कोणतीही घटना घडलेली नाही,” असे त्यांनी सांगितले.