Sand Highway, two tractors seized
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : वाळू तस्करांवर कारवाईचा बडगा उगारत महसूल विभागाने अवैध वाहतूक करणारा एक हायवा व दोन ट्रॅक्टर पकडून जप्त केले. या कारवाया सिल्लोड, आमठाणा, भराडी येथे वेगवेगळ्या दिवशी करण्यात आल्या. तर या प्रकरणी वाहन मालकांवर दंडात्मक कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे.
उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी ३० एप्रिलच्या रात्री गस्त घालताना शहराजवळ अवैध वाळू वाहतूक करणारा एक हायवा पकडला. शनिवारी (दि. २) तलाठी विशाल पाटील यांनी आमठाण्याजवळ एक ट्रॅक्टर पकडला. तर रविवारी (दि. ३) पुन्हा मंडळ अधिकारी अनिता डुमणे यांनी भराडीजवळ एक ट्रॅक्टर पकडला. पकडलेली वाळूची वाहने जप्त करुन तहसील कार्यालयात लावण्यात आली आहे.
या प्रकरणी ट्रॅक्टर मालक फारुख पटेल, सागर चव्हाण दोघे रा. बोरगाव बाजार व हायवा मालक राजू पटेल रा. नायगाव, हसूल यांच्यावर दंडात्मक कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे. यात हायवा मालकावर ३ लाख ३० हजार ६०० तर ट्रॅक्टर मालकांवर प्रत्येकी १ लाख ३९ हजार ६०० अशी एकूण ६ लाख ९ हजार ८०० रुपयांची दंडात्मक कार्यवाही प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाने दिली.
दरम्यान तालुक्यात खु-लेआम अवैध वाळू उपसा सुरु आहे. रात्री अंधाराचा फायदा घेत वाळू तस्कर धुमाकूळ घालत असून नदीपात्र अक्षरशः ओरबाडला आहे. यातून शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल डुबत असून महसूल विभागाने कारवाईचा फास आवळणे गरजेचे आहे.
तालुक्यात पथक केवळ नावालाच
अवैध गौण खनिजाला लगाम घालण्यासाठी पथक स्थापन करण्यात आलेले आहे. मात्र पथक नेमके गस्त घालते कोठे ? असा प्रश्न रात्री चालणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवरुन पडतो. विशेष म्हणजे ज्यांच्या हद्दीतून वाळू उपसा केला जाईल. त्या हद्दीतील तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन निंलबनाची कार्यवाही प्रस्तावित केली जाईल, असा स्पष्ट सूचना उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी दिलेल्या आहे. तरी देखील वाळू उपसा सुरुच आहे.