छत्रपती संभाजीनगर / ठाणे : कल्याण ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर सोमवारी (दि. २ नोव्हेंबर) भरदिवसा मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मृद व जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची इनोव्हा कार अडवून पिस्तूल व चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत पर्दाफाश केला. संभाजीनगर पोलिसांनी सिडकोतील टी. व्ही. सेंटर चौकातून गुन्ह्यात वापरलेल्या अर्टिगा कारसह मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या. त्यानंतर रात्री उशिरा ठाणे पोलिसांच्या पथकाने करमाड परिसरातून आणखी चार साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असलेले फरीद खान (कार्यकारी अभियंता, मृद व जलसंधारण विभाग, कळवा-मुंबई) हे चालक कृष्णा बाविस्करसह इनोव्हा कारने (एमएच ०२ ईएच ५०१९) मुंबईकडे निघाले होते. सकाळी १०:४५ वाजेच्या सुमारास शहापूर हद्दीतील चॅनल क्र. ६९१ जवळ पांढऱ्या अर्टिगाने (एमएच-२०- एचएन ६३७७) त्यांना ओव्हरटेक करत गाडी आडवी लावली. त्यातून उतरलेल्या ४ ते ५ मास्कधारी गुंडांनी चालकाच्या डोक्याला पिस्तूल आणि पोटाला चाकू लावून धमकावले. फरीद खान यांना महामार्गावरच उतरवून दरोडेखोर चालक व इनोव्हा घेऊन पसार झाले.
पुढे चॅनल क्र. ६९५.४ जवळ चालकाला रस्त्यावर सोडून देत, त्याचे व अभियंत्याचे मोबाईल, एटीएम कार्ड आणि ३० हजार रुपयांची रोख लुटून आरोपींनी इनोव्हा यू-टर्न मारून संभाजीनगरच्या दिशेने पळवली. घटनेनंतर खान यांनी दुसऱ्या मोबाईलवरून जीपीएसद्वारे गाडीचे लोकेशन तपासले असता, ती खुटघर टोलनाक्याजवळ नागपूर वाहिनीवर आढळून आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन रिकामी गाडी ताब्यात घेतली.
याप्रकरणी कल्याण तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, दिवसाढवळ्या समृद्धी महामार्गावर सशस्त्र दरोडा पडल्याचे समजताच संपूर्ण पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आली. ठाणे पोलिस आयुक्त, ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक, नाशिक पोलिस आयुक्त, नाशिक ग्रामीण अधीक्षक, छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार आणि संभाजीनगर ग्रामीणचे अधीक्षक प्रकाश जाधव या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने 'कॉन्फरन्स कॉल' द्वारे संपर्क साधत संयुक्त नाकाबंदीची रणनीती आखली.
आरोपी संभाजीनगरच्या दिशेने येत असल्याची खात्री पटताच, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशाने गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, सिडकोचे निरीक्षक अतुल येरमे, वाहतूक शाखेचे प्रभारी रविकांत गच्चे यांच्या नेतृत्वाखाली पथकांनी शहरात नाकाबंदी केली. सिडकोचे उपनिरीक्षक सोपान नरळे, गुन्हे शोध पथक आणि हवालदार रंजक सोनवणे यांनी टी. व्ही. सेंटर चौकातून २३ वर्षीय संशयिताला (रा. लाडसावंगी) अर्टिगा कारसह ताब्यात घेतले.
सहा महिन्यांत समृद्धीवर लूटमारीच्या चार घटना
गेल्या सहा महिन्यांत समृद्धी महामार्गावर लूटमार, दरोड्याच्या चार घटना घडल्या. यामध्ये १२ मे वैजापूर हद्दीत कार अडवून एका उद्योजकाला लुटले होते. त्या टोळीला संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर २८ जुलै रोजी सिंदखेड राजाजवळ टायर पंक्चर करून रोकड पळवली. तसेच १५ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर हद्दीत चाकूच्या धाकाने लूटमार करण्यात आली होती. तर २८ ऑगस्ट रोजी सिन्नरजवळ महामार्गावर खिळे टाकून टायर पंक्चर केले आणि छत्रपती संभाजीनगरच्या वकिलाच्या कुटुंबाला मारहाण करून १८ लाखांचा ऐवज लुटला होता.