Crime News pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime | समृद्धी दरोडा प्रकरण : दोन पोलिस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी उचलबांगडी

ग्रामीणची ५ पथके मागावर तरीही फरार टोळी सापडेना

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरील वैजापूर हद्दीत गेल्या आठवड्यात भरदिवसा उद्योजकाला लुटल्याप्रकरणी कर्तव्यात कसूर करणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी कारवाई केली आहे. 'हद्दी'चा वाद सांगून तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचे आरोप झाल्यानंतर वैजापूर आणि वीरगाव ठाण्यातील अंमलदारांची तडकाफडकी मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली आहे.

सोमवारी (दि. ३१ ऑगस्ट) पोलिस अधीक्षकांनी या बदलीचे आदेश काढले. वैजापूर पोलिस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक सुनील खरात आणि वीरगाव ठाण्यातील हवालदार गुणवंत थोरात अशी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. मात्र, एकीकडे ही कारवाई होत असताना, दुसरीकडे दरोडा टाकणाऱ्या मुख्य टोळीला जेरबंद करण्यात ग्रामीण पोलिसांना सात दिवसांनंतरही अपयश आले आहे. सिन्नरजवळील घटनेत नाशिक ग्रामीण पोलिसांनी दरोडेखोरांना २४ तासांत पकडले, पण ग्रामीण पोलिसांचे हात मात्र अद्यापही रिकामेच आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, ज्यावेळी महामार्गावर उद्योजकाची गाडी अडवून दरोडा टाकण्यात आला, तेव्हा हे दोन्ही कर्मचारी आपापल्या पोलिस ठाण्यात 'ठाणे अंमलदार' म्हणून कर्तव्यावर होते. दरोड्याची घटना घडल्यानंतर तक्रारदाराने मदत मागितली असता, या दोघांनी त्यांना 'हद्दी'चा वाद सांगून तक्रार नोंदवून घेण्यास सुरुवातीला टाळाटाळ केली होती. घटनेची माहिती मिळूनही तातडीने मदत न पाठवणे आणि कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांची थेट पोलिस मुख्यालयात रवानगी करण्यात आली आहे. या कारवाईतून कर्तव्यात कसूर खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पोलिस प्रशासनाने दिला आहे.

वैजापूरजवळील एक्झिट क्र. १८ (हडसपिंपळगाव) जवळ २६ ऑगस्टला दुपारी ४ वाजेच्या सुमारास राहुरीचे उद्योजक साहिल सोनवणे यांची फॉर्च्यूनर कार अडवून दरोडेखोरांनी अडीच तोळ्याची चेन लुटली होती. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी किरण अजिनाथ गायकवाड (वय २५, रा. हिवरसिंगा, ता. शिरूर कासार, जि. बीड) याला बेड्या ठोकल्या. किरणच्या चौकशीतून समृद्धी महामार्गावर धुमाकूळ घालणाऱ्या ८ ते १० दरोडेखोरांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. हे सर्वजण बीड जिल्हा व परिसरातील कुख्यात गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या टोळीच्या मुसक्या आवळण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची ४ आणि वैजापूरचे १ अशी तब्बल ५ पथके त्यांच्या मागावर आहेत. एकीकडे, सिन्नरजवळ दरोडा टाकणाऱ्या धाराशिवच्या टोळीच्या नाशिक पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मुसक्या आवळल्या आणि आपली तत्परता सिद्ध केली. मात्र, दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी शोध घेत असल्याचे सांगत असले तरी, घटनेच्या सातव्या दिवशीही पोलिसांच्या हाती काहीच ठोस असे काही लागलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT