समृद्धीवर भरधाव ट्रक आला यमदूत बनून  pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Samruddhi Expressway accident : समृद्धीवर भरधाव ट्रक आला यमदूत बनून

जेवण करणाऱ्या मजुरांवर काळाचा निर्घृण घाला, तिघांचा जागीच मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर पांढरे पट्टे ओढण्याचे काम करून वाहनांच्या आडोशाला जेवण करत बसलेल्या मजुरांवर काळाने निर्घृण घाला घातला. लोखंडी बेरिंग घेऊन मुंबईकडे निघालेला भरधाव कंटेनर अक्षरशः यमदूत बनून आला आणि त्याने जेवण करणाऱ्या या निष्पाप मजुरांना चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की, कंटेनरने वाहनांना तब्बल 200 फुटांपर्यंत फरफटत नेले. या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

शुक्रवारी (दि. 6) दुपारी 1 वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावर वडखा-नाथनगर शिवारात (चॅनल क्र. 406 जवळ) हा भीषण अपघात झाला. मागील अनेक दिवसांपासून हे मजूर एका इंजिनियरिंग कंपनीच्या वतीने समृद्धी महामार्गावर पांढरे पट्टे ओढण्याचे काम करीत आहेत.

सकाळपासून दुपारपर्यंत काम केल्यानंतर ते मेंटेनन्स ट्रक (एमएच 40, बीएम 8048) आणि जेसीबी (एमएच 20, एफयू 3208) यांच्यामध्ये सावलीत जेवणासाठी बसले होते. जेवणाचा घास तोंडात घेत असतानाच लोखंडी बेरिंग घेऊन जाणारा कंटेनर (एमएच 40, सीडी 5355) सेफ्टी बॅरिकेड्स उडवत थेट ओव्हरटेकिंग लेनमध्ये घुसला.

कंटेनरने सर्वात आधी मेंटेनन्स ट्रकला उडवले, त्यानंतर कामगारांना चिरडून तो थेट जेसीबीवर आदळला. ही धडक एवढी भयंकर होती की, कंटेनरने या दोन्ही वाहनांना जवळपास 200 फुटांपर्यंत फरफटत नेले, यात जेसीबीचेही पूर्णपणे तुकडे झाले. काही कळण्याच्या आतच तिथे रक्ताचा सडा पडला. अपघातस्थळी मजुरांच्या कामाचे साहित्य आणि जेवणाचे डबे सर्वत्र विखुरलेले होते. या अपघातानंतर समृद्धी महामार्गावरील एका बाजूची वाहतूक जवळपास अर्धा तास थांबविण्यात आली होती.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तसेच चिकलठाणा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पवार, उपनिरीक्षक उत्तम नागरगोजे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

मृतांची आणि जखमींची नावे

या दुर्दैवी अपघातात गणेश सांडू कसारे (वय 27, रा. नायगाव), राहुल राम गिरी (वय 31, रा. परतूर, जि. जालना) आणि विरेश्वर विश्वकर्मा (वय 32, रा. मोहू, उत्तर प्रदेश) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, ज्ञानेश्वर सोमनाथ घोरपडे (वय 26, रा. पोखरी), राम गोपाल पटेल (वय 31, रा. मध्य प्रदेश) आणि शैलेंद्र बिजेंद्र रॉय (वय 28, पश्चिम बंगाल) हे तिघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नियतीने उठवले जेवणाच्या ताटावरून

ही घटना मजूर जेवण करताना घडल्याची माहिती मिळताच मृत मजुरांच्या नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात एकच हंबरडा फोडला. नियतीने आमच्या लेकरांना जेवणाच्या ताटावरून उठवले, त्यांना दोन घास जेवण तरी करू द्यायचे होते, असा आक्रोश नातेवाईकांनी केला. अपघातस्थळी विखुरलेले जेवणाचे डबे आणि नातेवाईकांचा हंबरडा पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT